भन्नाट कला! पिंपळाच्या पानांतून अप्रतिम चित्रे रेखाटणारा तरुण

भन्नाट कला! पिंपळाच्या पानांतून अप्रतिम चित्रे रेखाटणारा तरुण

या तरुणाने कुठल्याही कृत्रिम साहित्याचा वापर न करता केवळ पिंपळाच्या पानावर कलाकृती साकारल्या आहेत.

  • Share this:

वाशिम, 15 डिसेंबर : आपल्या जीवनात छंदाला विशेष महत्व असून विरंगुळा म्हणून जोपासल्या जाणाऱ्या छंदातूनच अनेकदा अप्रतिम कलाकृती जन्म घेते. अशीच एक कला वाशिम जिल्ह्यातील एका तरुणाने जोपासली आहे. हा तरुण पिंपळाचे पान कोरून विविध सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती साकारत आहे. त्याच्या या कलाकृती समाज माध्यमांद्वारे अनेकांपर्यंत पोहोचत असून त्याच्या अनोख्या कलेचे कौतुक होत आहे.

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील वाकद या लहानशा गावात राहणाऱ्या शंतनू देशमुख तरुणाने हा अनोखा छंद जोपासला आहे. बालपणापासूनच चित्रकलेची आवड असल्याने काही वेगळे केले पाहिजे या कल्पनेतून त्याने कुठल्याही कृत्रिम साहित्याचा वापर न करता केवळ पिंपळाच्या पानावर कलाकृती साकारल्या आहेत.

शंतनूने पिंपळाच्या पानाला कोरून लेक वाचवा लेक शिकवा, स्त्री भ्रूण हत्या आणि कोरोना बाबत सामाजिक जनजागृती यासह अनेक थोर पुरुषांची चित्र आपल्या कलेच्या माध्यमातून रेखाटली असून आपल्या कलेतून विविध संदेश दिले आहेत. आपल्या कलाकृती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवल्याने त्यांना महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी बनविलेल्या या विविध कलाकृती अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहेत.

देशाच्या विविध भागांतील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना ही कला शिकविण्यासाठी येण्याचे निमंत्रण येत आहे. या कलेद्वारे शाळेच्या विद्यार्थ्यांना आनंदी पाहून मलाही खूप आनंद मिळतो असंही शंतनू यांनी नम्रपणे सांगितलं.

शंतनूला लहानपणापासूनच कलेची आवड आहे. त्याच्या पिंपळ पान कलेमुळं आमची सर्वत्र नवी ओळख बनली असून आम्हालाही शंतनू चा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईनं दिली आहे.

दरम्यान, पिंपळाच्या पानावरील शंतनू देशमुख याची ही कला खरच वाखाणण्याजोगी असून ग्रामीण भागातही प्रतिभावंतांची कमी नसल्याचं त्याने दाखवून दिलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 15, 2020, 11:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading