Home /News /maharashtra /

राज्यातील लसीकरण खरंच स्थगित करण्यात आलं? आरोग्य विभागाने केला महत्त्वपूर्ण खुलासा

राज्यातील लसीकरण खरंच स्थगित करण्यात आलं? आरोग्य विभागाने केला महत्त्वपूर्ण खुलासा

पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई, 17 जानेवारी : राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये 18 जानेवारीपर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्तासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने खुलासा केला आहे. महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 'रविवारी आणि सोमवारी लसीकरणाबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे ते रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार पुढील आठवड्यात चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येईल,' असं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. लसीकरण रद्द करण्याचं नेमकं वृत्त काय होतं? कोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक 17 आणि 18 जानेवारी असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड 19 लसीकरण मोहिमेची आज (दिनांक 16जानेवारी 2021) अंमलबजावणी करत असताना, या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोवीन ॲपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत,' असं वृत्त समोर आलं होतं. मात्र लसीकरण स्थगितीच्या वृत्तात तथ्य नसल्याचं आता आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात किती लोकांना मिळाली लस? कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अर्थातच शनिवारी महाराष्ट्रात सुमारे 18 हजार 338 हून अधिक (सुमारे 64 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून शनिवारी दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या