नरेंद्र माटे (वर्धा), 18 जानेवारी : वर्धा जिल्ह्यात शिक्षक मतदार संघाची निवडणूक असल्याने वर्ध्यात आचारसंहिता लागू आहे. याकरिता महसूल विभागाकडून अनेक भागात भरारी पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरातून कापूस खरेदी व्यापारी यांनी एचडीएफसी बँकेतून 65 लाखाची रक्कम काढली, व ते आपल्या कारमधून शेतकऱ्यांसाठी जिनिंगमध्ये घेऊन जात होते. आर्वी तळेगाव रस्त्यावरील जगदंबा परिसरात वाहनाची भरारी पथकाने तपासणी केली.
या कारमध्ये 65 लाखांची रोकड आढळून आली. सध्या ती रोकड वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली असल्याची माहिती आर्वीचे तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान या कारवाईने वर्धा जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. याचबरोबर तो कापूस व्यापारी एवढी मोठी रक्कम कोणत्या कारणासाठी घेऊन जात होता याबाबत पोलीस तपास करत आहेत.
हे ही वाचा : राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! मनसे प्रमुख उद्या बीडच्या परळी कोर्टात हजर राहणार, काय आहे प्रकरण?
भरारी, निगराणी व खर्च पथकांचे प्रशिक्षण
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी विविध पथकांचे गठण करण्यात आले आहे. यादरम्यान मतदान जनजागृती देखील केली जाणार आहे. निवडणूकीसाठी गठीत करण्यात आलेल्या पथकांमध्ये भरारी पथके, व्हिडीओ निगराणी पथके, खर्च विषयक पथकांचा समावेश आहे.
तालुकास्तरावर या समित्या नेमण्यात आल्या असून या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. तालुकानिहाय नेमण्यात आलेल्या भरारी पथकात कर्मचारी, अधिकारी, पोलिस अधिकारी व व्हिडिओग्राफरचा समावेश आहे.
निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार नोंदवावयाची असल्यास नोंदवता येतील. या निवडणूकीत जिल्ह्यातील 4 हजार 861 शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात 2 हजार 937 पुरुष तर 1 हजार 924 महिला मतदारांचा समावेश आहे.
हे ही वाचा : शिंदे गटाचा आता मनसेला धक्का! नागपूरमधील महिला नेत्याचा कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश
जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकून 14 मतदान केंद्र राहणार आहे. त्यात आष्टी, कारंजा, आर्वी, रोहणा, सेलू, सिंदी रेल्वे, देवळी, पुलगाव, समुद्रपुर, हिंगणघाट व वडनेर येथे प्रत्येकी एक तर वर्धा येथे 3 केंद्रांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Wardha, Wardha news