मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : सुंदर गावाला सरकार देणार लाखोंचं बक्षीस, तुमच्या गावालाही आहे मोठी संधी!

Video : सुंदर गावाला सरकार देणार लाखोंचं बक्षीस, तुमच्या गावालाही आहे मोठी संधी!

गाव स्वच्छ व सुंदर व्हावे या हेतूने 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' सध्या गावपातळीवर राबविले जात आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Wardha, India

वर्धा, 24 नोव्हेंबर : ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाचा उद्देश जनतेच्या आरोग्य मानाचा दर्जा उंचावण्याचा आहे. निरोगी गावासाठी स्वच्छ व सुंदर गाव फायद्याचे आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर व्हावे या हेतूने 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' सध्या गावपातळीवर राबविले जात आहे. हेच अभियान लाखोंची बक्षिसे गावांना मिळून देऊ शकते. परिणामी प्रत्येक ग्रामस्थाने आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून स्वच्छ व सुंदर झालेल्या गावावर रोख बक्षिसांचा पाऊसच पडणार आहे.

राज्यात सद्यस्थितीत स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 राबविण्यात येत आहे. यातून सर्वांनी वैयक्तिक शौचालयांचा शाश्वत वापर करणे, गावातील संपूर्ण परिसर, शाळा, अंगणवाडी, शासकीय / निमशासकीय इमारती, कार्यालये, सहकारी संस्था, सार्वजनिक बाजार, सार्वजनिक स्थळे, यात्रा व पर्यटन स्थळे आदी परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा उद्देश आहे. त्याला आता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची जोड मिळाल्याने प्रत्येक गावाची वाटचाल स्वच्छ व सुंदरच्या दिशेने राहणार आहे. स्वच्छ गावांसाठी हा उपक्रम महत्त्वांचाच आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेतून पाणी व स्वच्छता संदर्भातील कामांची तपासणी करण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावरून वेळोवेळी विस्तृत मार्गदर्शन सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. शिवाय पुढील वर्षाकरिता मार्गदर्शक सूचना 7 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने निर्गमीत करण्यात आल्या आहेत.

अशी असेल निवड प्रक्रिया

जिल्हा परिषद गट अंतर्गत निवड झालेल्या उत्कृष्ट अशा स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायतीची तालुका स्तरासाठी निवड केली जाणार आहे. तालुक्यांमधील उत्कृष्ट ग्रामपंचायतींमधून जिल्हास्तरीय स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायतीची निवड केली जाणार आहे. त्यानंतर विभागीय स्तरावर उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड होणार असून विभागांमधून थेट राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायतीची निवड होणार असल्याचे सांगण्यात आले.

Video : पोस्ट विभागाच्या योजना लय भारी, गुंतवणुकीत झाली 30 टक्क्यांनी वाढ

50 लाखांपर्यंतचे बक्षीस

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छ आणि सुंदर ग्रामपंचायतींना रोख बक्षिसे मिळणार आहेत. जिल्हा परिषद गट स्तरावर प्रथम बक्षीस 60 हजार रुपये असून जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस 6 लाख, द्वितीय 4 लाख तर तृतीय बक्षीस 3 लाख आहे, तर विभाग स्तरावर प्रथम बक्षीस 12 लाख, द्वितीय 9 लाख, तृतीय 7 लाख तसेच राज्य स्तरावर प्रथम बक्षीस 50 लाख, द्वितीय 35 लाख तर तृतीय 30 लाख असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

असे राहणार विशेष पुरस्कार

जिल्हा विभाग व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर आलेल्या ग्रामपंचायती वगळून जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर काही निकष विचारात घेऊन विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. वसंतराव नाईक पुरस्कार - घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापनाच्या अनुषंगाने असलेल्या एकूण 56 गुणांपैकी जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीला जिल्हास्तर 50 हजार, विभागस्तर 75 हजार, राज्यस्तर 3 लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने असलेल्या एकूण 34 गुणांपैकी जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतीला विभागस्तर 75 हजार, राज्यस्तर 30 लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे.

नागझरीपासून शुभारंभ 

स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- शौचालय व्यवस्थापनाच्या अनुषंगाने असलेल्या एकूण 67 गुणांपैकी जास्त गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतला जिल्हास्तर 50 हजार, विभागस्तर 75 हजार व राज्यस्तर 3 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ नागझरी या गावातून झाला. जिल्हा परिषदेच्या सीईओंनी खुद्द हातात झाडू घेऊन ग्रामस्वच्छता करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, यांनी दिली.

First published:

Tags: Local18, Wardha