वर्धा, 06 डिसेंबर : शहरी व ग्रामीण भागातील आजारी मुलं वेळीच शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम फायद्याचा ठरतो. पण या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत दुसऱ्या फेरीत केवळ 8 टक्केच मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागालाच आजारी चिमुकले शोधण्याची वेळ आली आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्यानं आरोग्य विभागाला मुलं शोधून तपासणी करण्याची वेळ आली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या काळात 0 ते 6 वयोगटातील वर्धा जिल्ह्यातील 83 हजार 599 मुला- मुलींची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. यात पहिल्या भेटी दरम्यान 96 टक्के म्हणजे 80 हजार 312 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 या काळात नव्या जोमाने उपक्रम राबवून दुसऱ्या भेटीदरम्यान 0 ते 6 वयोगटातील एकूण 82 हजार 883 मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागात देण्यात आले आहे.
पण आतापर्यंत केवळ 8 टक्के म्हणजे 6 हजार 949 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास नक्कीच त्याचा निरोगी वर्धा जिल्ह्यासाठी फायदा होणार आहे
देवाचे जुने फोटो आणि मुर्तीचं काय करायचं प्रश्न पडलाय? 'इथं' करा संपर्क, Video
67736 मुला-मुलींची तपासणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या स्कूल भेटीदरम्यान 7 ते 18 वयोगटातील एकूण 1 लाख 15 हजार 531 मुला- मुलींची जुलै 2022 ते मार्च 2023 या काळात आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 59 टक्के काम झाले असून आरोग्य तपासणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 67 हजार 736 इतकी असल्याचे सांगण्यात आले. 0 ते 6 आणि शासकीय, निमशासकीय शाळेमधील 7 ते 18 वयोगटातील सर्व मुला-मुलींची आरोग्य तपासणी करणे. तसेच तपासणी दरम्यान आराजी मुलांना पुढील योग्य व वेळेवर उपचार मिळून देणे हा मुख्य उद्देश राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा आहे.
Traffic rules: गाडी चालवण्यापूर्वी 'हे' नियम माहिती हवे, अन्यथा होईल मोठी शिक्षा
अंगणवाडीच्या मुलांची दोन वेळा तपासणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी स्तरावरील बालकांची तपासणी वर्षातून दोन वेळा करण्यात येते. तर शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांची तपासणी वर्षातून एक वेळा करण्यात येते. विशेष म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी या हेतूने एकूण 17 पथके कार्यरत आहेत. या पथकात पुरुष वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, परिचारिका यांचा समावेश असतो.
तपासणीत या गोष्टींची होते शहानिशा
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य तपासणी करताना जन्मतः व्यंग असणारे आजार, जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार, बालपणातील आजार व शारीरिक आणि बौद्धिक विकासात्मक वाढीतील होणारे आजार आदींबाबत तज्ज्ञांकडून शहानिशा केली जाते, अशी माहिती डॉ. रा. ज. पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.