मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वर्ध्यात दिसले 117 प्रजातींचे सुंदर पक्षी, पांढरा करकोचाही आढळल्याची नोंद!

वर्ध्यात दिसले 117 प्रजातींचे सुंदर पक्षी, पांढरा करकोचाही आढळल्याची नोंद!

जिल्ह्यात पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. यात 117 प्रकारच्या पक्षी प्रजातींच्या नोंदी घेण्यात आली.

जिल्ह्यात पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. यात 117 प्रकारच्या पक्षी प्रजातींच्या नोंदी घेण्यात आली.

जिल्ह्यात पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. यात 117 प्रकारच्या पक्षी प्रजातींच्या नोंदी घेण्यात आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

वर्धा, 25 नोव्हेंबर : वर्धा  जिल्ह्यात महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या मार्गदर्शनात वन्यजीव प्रेमी ग्रुप, जंगल डायरी युट्यूब चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. यात जिल्ह्यात 117 प्रकारच्या पक्षी प्रजातींच्या नोंदी घेण्यात आली. सर्व पक्षी प्रजातींच्या नोंदी जागतिक ई बर्ड या संकेत करण्यात आल्या. यात हिवाळी व स्थानिक स्थलांतरित असुरक्षित व संकट समीप पक्षी प्रजातींच्या नोंदी पक्षी निरीक्षकांनी केल्या. यानिमित्त विविध तलाव, नदीचे काठ, शेतालगतचा परिसर, गवताळ प्रदेश, शहराचा परिसर, ऑक्सिजन पार्क आणि ग्रामीण व जंगल भागात पक्षी निरीक्षण करण्यात आले. 

बहुतेक तलावावर सकाळी, दिग्रस तलावावर दुपारी, साटोडा चौकाजवळील पडीत जागेवर संध्याकाळी आणि वर्ध्यातील सिविल लाइन्स ते सेवाग्राम स्टेशनचा परिसरात रात्रीला अशा चारही वेगवेगळ्या वेळेस पक्षी निरीक्षण केले गेले आणि पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. आठवडाभर पक्ष्यांविषयी जनजागृती, संरक्षण व संवर्धन व्हावे या उद्देशाने पक्षी निरीक्षण, हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांच्या नोंदी ऑनलाईन पक्षी ओळखा स्पर्धा, चित्रमय सादरीकरण अशा विविध उपक्रमांद्वारे पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला.

सेवाग्राम आश्रमाचा परिसर, मासोद गावालगतचा धाम नदीचा काठ, निसर्ग साथी फाउंडेशनने पोथरा तलाव, दिग्रस तलाव, बोरधरणाचा परिसर, ऑक्सिजन पार्क, निसर्ग हिल्सचा परिसर, रोठा तलाव, जामणी गावालगतचे मदन धरण आणि पवनार येथील धाम नदीचा किनारा, शहरातील केळकरवाडीचा परिसर, साटोडा गावाजवळील गवताळ प्रदेश, सिविल लाइन्स ते सेवाग्राम स्टेशनचा परिसर अशा विविध ठिकाणी पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.  वनविभाग व महाराष्ट्र पक्षीमित्र, विदर्भ (नागपूर विभाग) यांच्या संयुक्तरीत्या आयोजित बोर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गावंडे आणि पुनम ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पक्षी सप्ताहाच्या चवथ्या दिवशी सादरीकरण घेण्यात आले होते.

या पक्षांचे दर्शन

आययूसीएनच्या असुरक्षित यादीत असणारा नदी सुरय, संकट समीप यादीत असलेले रंगीत व पांढऱ्या मानेचा करकोचा, तिरंदाज तसेच शिकारी पक्षी आखूड बोटांचा सर्पगरुड, सरडमार गरुड आणि शिका आढळला. हिवाळी स्थलांतरित चक्रवाक, हिरवट, दंगेखोर बोरू व पायमोज वटवट्या, काळा करकोचा, शंकर, काळा थिरथिरा, चिपचीप, छोटा शुभ्रकंठी वटवट्या, पिवळा व पांढरा धोबी, छोटा कंठेरी चिखल्या, छोटा व टेमिकचा टीलवा, धान व ब्लीयची तीरचिमणी दिसले. 

Video : घराच्या गच्चीवर भरते पक्षांची शाळा, पाहा कोण लावतं हजेरी?

उघड्या चोचीचा करकोचा

राखी तित्तीर आणि राखी रानकोंबडी यांच्या आवाजावरून त्यांच्या वास्तवाची खात्री झाली. तसेच स्थानिक स्थलांतरीत वेडा राघू व पांढऱ्या भुवईचा बुलबुल हा पक्षी दिसला. तुतारी प्रजातीतील सामान्य, चिखली, हिरवी आणि ठिपकेवाली अशा चार प्रजाती आढळल्या. लाल, पांढऱ्या कंठाची आणि ठिपकेवाली मुनिया यांचे दर्शन झाले. पक्षी सप्ताह दरम्यान गाय बगळा, टिटवी, वेडा राघू, पोपट, पारवा, पिवळ्या कंठाची चिमणी, कावळा आणि छोटा तपकिरी होला, घर पाकोळी, लाल बुड्या बुलबुल यांचे मोठ्या संख्येत दर्शन झाले. उघड्या चोचीचा करकोचा, टकाचोर व इतर सामान्य पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

पक्षांच्या प्रजातींना धोका

जंगलतोड, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, कीटकनाशकांचा अती वापर, जागतिक तापमानात वाढ, गाळपेरा, तलावावरील मोठ्या प्रमाणत होणारी मासेमारी, यावर्षी झालेली अतिवृष्टी, अति प्रमाणात होणारे सिमेंटीकरण अशा अनेक बाबींमुळे पक्षांच्या प्रजातींना धोका निर्माण होत आहे.

First published:

Tags: Local18, Wardha