वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 11 मार्च : कुठल्याही संकटावर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मात करता येते. वर्धा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात राहमाऱ्या माया राजेश शेंडे यांनी हे दाखवून दिले आहे. माया यांचे पती राजेश यांना एका अपघातात दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आणि दिव्यंगत्व आले. पण अशाही परिस्थितीत माया यांनी स्वतःला सावरत स्वयंरोजगाराची कास धरली. ई-रिक्षाचे स्टेअरिंग हाती घेऊन त्या आर्थिक स्वावलंबी झाल्या.
पतीचे अपघातात पाय गेले
माया शेंडे यांच्या पती यांचा अपघात झाला होता त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि कायमचे दिव्यंगत्व आले. तेव्हा दहावी शिकलेल्या माया यांनी खचून न जाता रोजंदारी सुरू केली. गावात फिरून स्टेशनरी साहित्य विकू लागल्या. घरची सगळी जबाबदारी सांभाळत त्यांनी मुलांचे शिक्षणही सुरू ठेवले.
ई-रिक्षातून स्टेशनरीची विक्री
माया गाडी चालविण्याचा परवाना काढून ई-रिक्षाचे स्टेअरिंग हाती घेतले. ई-रिक्षा घेण्यासाठी बँकेकडून एक लाखांचे मुद्रा कर्ज घेतले. शिवाय स्वतः जवळचे ५० हजार टाकून भांडवल उभे केले. आता त्या दररोज ई-रिक्षाच्या साहाय्याने परिसरातील दहा गावांत फिरून स्टेशनरीच्या विविध साहित्याची विक्री करतात. विशेष म्हणजे स्वयंरोजगाराची कास धरलेल्या माया या दिव्यांग पती व कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासह मुलाला इंजिनिअरिंग तर मुलीला बीएस्सीचे शिक्षण देत आहे.
महिलांच्या वस्तूंना सातासमुद्रापार मिळालं मार्केट, पोटापाण्याचा प्रश्नही मिटला! Video
समाजातील अनेकांसाठी प्रेरणा
माया शेंडे या स्टेशनरी साहित्य, रेडिमेड कपडे, शालेय पुस्तके तसेच विविध जीवनावश्यक वस्तूं विकून स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. स्वयंरोजगाराची कास धरलेल्या माया आत्मनिर्भर झाल्या आहेत. तसेच त्यांनी स्वतःचे पक्के घर बांधले आहे. त्यांचे हे कर्तृत्व विविध कारणांनी मनोधैर्य खचलेल्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Wardha, Wardha news