वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 21 मार्च : महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. या योजनांचा वर्धा जिल्ह्यातील हजारो रुग्णांना लाभ झाला आहे. जनआरोग्य योजनेतून 16 हजार 759 रुग्णांना विविध शस्त्रक्रियेसाठी मोफत उपचार मिळाले आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी जनआरोग्य योजना नवसंजीवनी ठरत असल्याचे चित्र आहे.
काय आहे जनआरोग्य योजना ?
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विविध आजारांवरील शस्त्रक्रिया आणि उपचार नागरिकांना मोफत दिले जातात. यासाठी नागरिकांकडे रेशन कार्ड व आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ मिळत नाही.
कोणाला मिळणार योजनेचा लाभ ?
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. पिवळे, केशरी, अंत्योदय व इतर शिधापत्रिकाधारक कुटुंबे या योजनेच्या लाभास पात्र ठरतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका व फोटो, ओळखपत्र, आधारकार्ड आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ मिळू शकतो.
जिल्ह्यातील 9 रुग्णालयांत मिळणार लाभ
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. जिल्ह्यातील सेवाग्राम येथील रुग्णालय, सावंगी येथील रुग्णालय तसेच इतर खासगी रुग्णालये अशा एकूण 9 रुग्णालयांतून या योजनेचा लाभ घेता येतो.
किडनीसाठी स्टोनपेक्षाही जास्त घातक असतात हे 3 आजार! ही लक्षणं दिसताच करा तपासणी
आता पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत
महात्मा फुले जन आरोग्य योजना ही राज्य शासनाची असून, यात केशरी, पिवळे, तथा अंत्योदय रेशन कार्डधारक पात्र लाभार्थ्यांचा समावेश असतो. या योजनेत पूर्वी दीड लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा कवच देण्यात येत होते. मात्र, आता पाच लाखांपर्यंतचे उपचार मिळेल
वर्षभरात जिल्ह्यात 16,759 नागरिकांनी घेतला लाभ
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा मागील वर्षभरात जिल्ह्यातील 16 हजार 759 नागरिकांनी लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत 34 विशेषतज्ज्ञ सेवांतर्गत 996 प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे, अशी माहिती वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय समन्वयक डॉ. प्रवीण धाकटे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Wardha, Wardha news