वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा,
वर्धा, 9 मार्च : हिंगणघाट येथे घराचे बांधकाम करताना घुबडाची तीन पिलं आढळून आली. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यांनी 'पिपल्स फॉर अॅनिमल' या संस्थेच्या माध्यमातून पिल्लांना रेस्क्यू करीत पिपरी येथील करूणाश्रमात दाखल केले. वर्धा जिल्ह्यातील करुणाश्रम हे प्राण्यांचे आश्रयस्थान असून सध्या तेथे 500 पशुपक्ष्यांना निवारा उपलब्ध करून देण्याता आला आहे.
प्राण्यांसाठी हक्काचे घर
पिपरी येथे 1999 मध्ये करुणाश्रमाची स्थापना झाली. या ठिकाणी जखमी पशुपक्ष्यांवर उपचार केले जातात. तसेच निवारा उपलब्ध करून दिला जातो. येथे प्राण्यांवर उपचारासाठी ऑपरेशन थिएटर, अॅनिमल अॅम्बुलन्स अशा सुविधा आहेत. तसेच प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी जागाही प्रशस्त आहे. सध्या जवळपास 500 पशुपक्ष्यांना या ठिकाणी निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वन्य प्राण्यांनाही निवारा
करुणाश्रमात वन्य प्राणी ज्यामध्ये बिबट्या, अस्वल, हरीण यासारखे प्राणी असून विविध पक्षीसुद्धा आहेत. विशेष म्हणजे जंगली प्राण्यांना ठेवण्यासाठी विशेष सुरक्षित सुविधा याठिकाणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राण्यांची वाहतूक करण्यासाठी सापळे, पिंजरे व बचाव उपकरणे सुद्धा उपलब्ध आहेत. जनावरांच्या चारा लागवडीसाठी विशेष युनिटसुद्धा आहेत. या करुणाश्रमात वन्य प्राण्यांचे बचाव आणि पुनर्वसन केले जाते. सोबतच त्यांना निवारा, अन्न आणि वैद्यकीय सुविधा दिल्या जातात.
Wardha News: वर्ध्यात वाघ, बिबट्याची दहशत; 11 महिन्यांत 8 ठार, 74 जखमी
मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्राधान्य
जिल्ह्यात कोणत्याही भागात केव्हाही एखाद्या ठिकाणी वन्यप्राण्यांसोबत घटना घडली किंवा ते संकटात सापडले तर त्यासाठी येथील पथक रूग्णवाहिकेसोबत तात्काळ रवाना होते. त्या प्राण्याला सुखरूप बाहेर काढून त्याच्यावर उपचार करून पुन्हा जंगलात मुक्त संचार करण्यासाठी सोडण्यात येते. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी करुणाश्रम आणि 'पिपल्स फॉर अॅनिमल'च्या माध्यमातून काम केले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Wardha, Wardha news