वर्धा, 11 जानेवारी : भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कौरवांची उपमा दिली होती. यावरुन काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी कधीही विकासासंदर्भात बोलत नाही. ते फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू धर्माचा अपमान करत असतात. त्यांची दाढी काढून रेशीमबागकडे पाठवा, मग कसे पहिल्या रांगेत बसलेले दिसतात असेही राणे म्हणाले. वर्धा येथील भाजपच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
"राहुल गांधी विकासा संदर्भात बोलतो का? काँग्रेसचा एक नेता तरी विकासावर बोलतो का? भारत जोडो यात्रेतील राहुल गांधींची कोणतीही पत्रकार परिषद बघा. त्यांना फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायची, हिंदू धर्मावर टीका करायची, फक्त आमच्या साधू संतांवर टीका करायची, सावरकरांवर टीका करायची. बाकी काहीच नाही. नुसतं फक्त हिंदू समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सावरकरांच्या पलीकडे गांधी काहीच बोलत नाही" राणे पुढे म्हणाले की माझा सल्ला आहे की राहुल गांधी यांची दाढी काढून आमच्या रेशीमबागेत पाठवा. मी सांगतो पुढच्या दसऱ्या मेळाव्यात पहिल्या रांगेत बसलेला दिसेल. खाकी पँट घालून पहिल्या रांगेत राहुल गांधी दिसतील, माझी गँरंटी आहे. त्यांच्याकडे दुसरा अजेंडाच नाही, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
Video : भाजप आमदार नितेश राणे यांची काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका#niteshrane #wardha pic.twitter.com/loVlZjjc0D
— News18Lokmat (@News18lokmat) January 11, 2023
एकविसाव्या शतकातले कौरव म्हणजे आरएसएस : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, एकविसाव्या शतकातले कौरव म्हणजे आरएसएस आहे. हे कौरव पँट घातलतात आणि हातात काठी घेऊन शाखेत जातात. त्यांच्याकडे हिंदुस्थानातले दोन-तीन सगळ्यात श्रीमंत अरबपती असल्याची टिपण्णी राहुल यांनी केली. राहुल गांधींच्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मागील काही दिवसांपासून ते संघ आणि भाजपवर जोरदार टीका करीत आहेत. भारत जोडो यात्रा ही देशामध्ये प्रेम आणि एकता अबाधित ठेवण्यासाठी असल्याचं राहुल गांधी सांगत आहेत. शिवाय ही यात्रा आपली इमेज घडवण्यासाठी नसल्याचंही ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, राहुल गांधी जो तुमच्या डोक्यात आहे, त्याला मी मारलं आहे. तो माझ्या डोक्यात नाहीये, तो निघून गेला. तुम्ही ज्या माणसाला बघताय, तो राहुल गांधी नाही. फक्त आपल्याला तसं वाटतंय. ''तुम्हाला विश्वास नसेल तर हिंदू धर्माला वाचा. शिवजींना वाचा. राहुल गांधी तर तुमच्या आणि भाजपच्या डोक्यात आहे. परंतु माझ्या डोक्यात नाही.'' मला माझ्या इमेजची पर्वा नाहीये. तुम्ही जी माझी इमेज बनवणार आहात, तशी बनवा. मला याचा काहीही फरक पडत नाही. मला फक्त माझं काम करायचं आहे. शिवाय माझी प्रतिमा किती बदलली आणि किती नाही हे तर तुम्हालाच ठरवायचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nitesh rane, Rahul gandhi