'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO

'जीव' झोळीत घेऊन असं धावतात गावकरी.. पाहा भीषण वास्तव दाखवणारा VIDEO

6 किलोमीटरच्या पक्क्या रस्त्यासाठी स्वातंत्र्याच्या 70 वर्षांपासून गावकऱ्यांचा संघर्ष सुरूच

  • Share this:

बीड, 24 सप्टेंबर: वयोवृद्ध रुग्णाला झोळीत घेऊन हॉस्पिटलकडे धावणाऱ्या गावकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गावाला रस्ता नसल्यानं चिखलातून वाट काढत जीव वाचवण्यासाठीची गावकऱ्यांची धडपड या व्हिडिओमध्ये दिसत आहे. बीड जिल्ह्यातील हनुमानवाडीमधील भीषण वास्तव दाखवणारा हा व्हिडीओ आहे. 6 किलोमीटरच्या पक्क्या रस्त्यासाठी स्वातंत्र्याच्या 70 वर्षांपासून गावकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे. दळणवळणाचा पक्का रस्ता नसल्यानं गावकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा...प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाची 'बनवा बनवी'; लोकांनी धू धू धुतला...पाहा VIDEO

वारंवार निवेदनं, पत्र आणि अर्ज देऊनही गावचा रस्ता न झाल्यानं गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी स्वतः च्या वाहनांनं गावात येऊन दाखवावं, लाख रुपये देऊन सत्कार करू. असं आव्हान गावकऱ्यांनी दिलं आहे. आम्ही देखील माणसंच आहोत. रस्त्याच्या प्रश्न मार्गी लावा, अशा संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील हजार लोकवस्ती असलेल्या हनुमानवाडी, म्हाळसवाडी या गावात स्वातंत्र्याच्या 70 वर्षांपासून पक्का रस्ता झाला नाही. गावात कुणी वयोवृद्ध आजारी असेल तर झोळीत घालून घेऊन जावं लागतं. तसेच साप, विंचू चावला तर हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत रुग्णाचा जीव जातो की काय, अशी भीती कायम राहाते. यातच या दोन्ही गावाला जोडणाऱ्या रस्त्यात नदी ओढे आहेत. गावकऱ्यांनी तयार केलेला कच्चा रस्ता दरवर्षी पावसामुळे वाहून जातो. त्यामुळे हॉस्पिटलला जायचं कसं? असा प्रश्न नेहमीच आ वासून उभा राहतो. जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी गावात येऊन आमची परिस्थिती पाहावी. या मरणाच्या रस्त्यापासून सुटका करावी, अशी आर्त मागणी हनुमानवाडी आणि म्हाळसवाडी येथील नागरिकांनी दिली आहे.

चिकूच्या बी नं चिमुरड्याचा श्वास रोखला....

हनुमानवाडी गावात राहणाऱ्या विमलबाई सानप यांचा तीन वर्षांचा नातून पुण्याहून लॉकडाऊनच्या कालावधीत गावी आला होता. राजवीर संजय सानप असं त्याचं नाव. चिक्कू खात असताना राजवीरच्या घशात चिकूची बी अडकली. त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. मात्र, मोटरसायकल, ॲम्बुलन्स रस्त्यानं जात नसल्यानं 1 तास उशीर झाला, रस्त्यातच राजवीर यानं प्राण सोडला होता. गावाला चांगला रस्ता मिळाला असता तर आज आमचा राजवीर आमच्याशी बोलला असता, खेळला असता, असं सांगताना विमलबाई यांच्या डोळ्यात पाणी तराळलं होतं. दर आठवड्यात कोणी ना कोणी आजारी पडल्यानंतर नेहमी अशीच जीवघेणी कसरत जीव वाचवण्यासाठी करावी लागते. असे या गावातील तरुण पांडुरंग सानप यांनी सांगितले.

हेही वाचा...कंगनाच्या याचिकेवर उद्यापासून सुनावणी, संजय राऊतांना मात्र 1 आठवड्याची मुदत

बीड जिल्ह्यात हनुमानवाडी, म्हाळसवाडी रस्ता पंतप्रधान सडक योजनेंतर्गत मंजूर झाला आहे. मात्र, कंत्राटदार आणि प्रशासनातील गलथान कारभारामुळे हा रस्ता होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांना जीव गमवावा लागत आहे. लवकरात लवकर आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 24, 2020, 2:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading