अंबरनाथ, 06 डिसेंबर : अंबरनाथमध्ये (Ambarnath) रेल्वे रुळाच्या बाजूला (Railway Track) असलेल्या एका केमिकल कंपनीच्या वेस्टेज पाइपलाइनला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकच्या पश्चिम भागात बोरॅक्स कंपनी आहे. सध्या ही कंपनी बंद आहे. या कंपनीजवळ पाइपलाइनचे काम सुरू होते. परंतु, कंपनीतील वेस्टेज केमिकल बाहेर पडून होतं. आज दुपारच्या सुमारास अचानक या केमिकलने पेट घेतला. बघता बघता काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे दूर पर्यंत धुराचे लोट पाहण्यास मिळत होते. धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी आग लागली तिथून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर एक रेल्वे गाडी उभी होती.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. आगीच्या दोन गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने कंपनी बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मुंबईत लालबाग परिसरात सिलेंडरचा स्फोट, 16 जण जखमी
दरम्यान, मुंबईतील लालबाग परिसरातील एका इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची भीषण घटना घडली. या स्फोटात 16 जण जखमी झाले असून जखमींवर केईएम रुग्णालयात (kem hospital) उपचार सुरू आहे.
लालबाग इथे गणेश गल्ली परिसरातील साराभाई इमारतीत आज सकाळी 7.50 च्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या एका बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गॅस गळती होत होती. याबद्दल स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर गॅस गळतीचा वास कुठून येतो हे पाहण्यासाठी स्थानिक आणि अग्निशमन दलाचे अधिकारी इमारतीत गेले असता अचानक स्फोट झाला.
आगीचा अचानक भडका उडाल्यामुळे 16 जण जखमी झाले आहे. यात 3 महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे. जखमींपैकी काही जणांवर केईम अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तर चार जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.