संगमनेर, 18 जानेवारी : महाराष्ट्रातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुकीचे (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) निकाल आता हाती येत आहे. निकालाअंती अनेक दिग्गज नेत्यांना धक्के बसले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasheb Thorat) यांना संगमनेरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या गटाने दणदणीत विजय मिळवला आहे.
संगमनेरमध्ये विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद हा सर्वश्रुत आहे. संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेते पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले होते. आज ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली असता बाळासाहेब थोरातांना मोठा धक्का बसला आहे. विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने दणदणीत विजय मिळवला आहे. 11 जागेवर विखेंच्या जनसेवा मंडळाने विजय मिळवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कनोली ग्रामपंचायतीत बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व होते. पण, आता सत्तांतर झाले असून विखे पाटलांच्या गटाने ग्रामपंचायतीचा ताबा घेतला आहे.
तर दुसरीकडे लोणी खुर्द गावात राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात सत्तांतर झालं असून 17 पैकी 13 जागा जिंकत परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. या लोणी खुर्द गावात तब्बल 20 वर्षानंतर सत्तांतर झालं आहे. त्यामुळे या गावावर एकहाती वर्चस्व असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
अहमदनगर उत्तर विभागातील राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड, काळे , कोल्हे, मंत्री शंकरराव गडाख यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी कुणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे हळहळू स्पष्ट होऊ लागलं असून अद्याप अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचे निकाल येणे बाकी आहे.
तर काँग्रेसचे नेते आणि मंत्री अमित देशमुख यांना होमग्राऊंड असलेल्या लातूरमध्ये धक्का बसला आहे.
बाभळगावात अमित देशमुख गटाला एकहाती सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नाला खीळ बसली आहे. एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे.
बाभळगावात अमित देशमुख गटाच्या पॅनल विरोधात श्रीराम गोमरे हे अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. मागील तीन टर्म देशमुख गटाच्या विरोधात ते निवडणूक लढवत होते. यावेळी 16 मतांनी त्याचा विजय झाला आहे.
15 सदस्य असलेल्या ग्रामपंचतीच्या निवडणुकीत देशमुख गटाचे 7 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 8 जागांसाठी निवडणूक झाली. गावात संपूर्ण लोकप्रतिनिधी देशमुख गटाचे असतील, असा मानस देशमुख गटाने केला होता. मात्र, तो प्रयत्न अपक्ष उमेदवार निवडून आल्याने अपयशी ठरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat