सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील

सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील

मुंबईत विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आठवले यांना अटक करण्याची मागणी केली

  • Share this:

मुंबई,20 ऑगस्ट 2018: महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ.जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये.

मुंबईत विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आठवले यांना अटक करण्याची मागणी केली. डॉ. दाभोलकरांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आज सीबीआयच्या ताब्यात आहेत. पण मागील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे 500 तरूणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असेल तर पोलिसांनी डॉ. जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. कट्टरवादी संघटनांना वेसण घालण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर अटकेची ही कारवाई तातडीने केली जाईल, असं पाटील म्हणाले.

तसंच दोन दिवसांपूर्वी हमीद दाभोलकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मूळ सूत्रधाराचा पर्दाफाश करण्याची मागणी केली होती. आज पुण्यात निघालेल्या मोर्चातून देखील हीच मागणी करण्यात आली आहे. या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, प्रोफेसर एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडाच आजवर फक्त प्यादे जेरबंद झाले आहेत. पण देशात सुरू असलेले षडयंत्र नेस्तनाबूत करायचे असेल तर त्यासाठी याचे कर्ते-करविते ‘महागुरू’ समाजासमोर आणून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे. या चारही हत्याकांडात सातत्याने सनातनचे नाव घेतले जाते. पण या संघटनेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले गप्प का आहेत? त्यांच्याऐवजी त्यांचे दुसऱ्या अन् तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते समोर येऊन खुलासे का करीत आहेत? असा सवाल  राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र एटीएसने मागील दोन आठवड्यांमध्ये केलेल्या कारवाईचे खरे श्रेय कर्नाटक एटीएसला आहे. गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास करताना त्यांनी अनेक गोष्टींचा छडा लावला आणि त्यातूनच महाराष्ट्रातील हे कट्टरवादी ‘नेटवर्क’ समोर आलं अन्यथा वैभव राऊतचे बॉम्ब फुटेपर्यंत राज्य सरकारला महाराष्ट्रात काय सुरू आहे,याचा पत्ता लागला नसता, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि बॉम्बसाठा सापडतो, तरूणांना फितवून शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण दिल्याचे दिसून येते, संशयित मारेकऱ्यांकडे डायरीत पुरोगामी चळवळीतील विचारवंतांची'हिटलिस्ट' सापडते. देशविघातक कारवायांचे एवढे पुरावे हाती लागल्यानंतरही सरकार गप्पच आहे. प्रारंभी विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. आता सामूहिक हत्यांचा कट रचला जातो आहे. वैभव राऊतकडे सापडलेले 20 बॉम्ब, 21 गावठी पिस्तुले दिवाळी साजरी करायला आणलेले नव्हते. बकरी ईद,गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांमध्ये बॉम्ब फोडून त्यांना धार्मिक हिंसाचार घडवायचा होता. मराठा क्रांती मोर्चामध्ये बॉम्ब फोडून राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात आणायचा होता. या साऱ्या बाबी देशाविरूद्ध छुपे युद्ध पुकारल्यासारखे असून, यापश्चातही सरकार संबंधित संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय का घेत नाही? अशी संतप्त विचारणा विखे पाटील यांनी केली.

या संघटनांचे काम ‘अल कायदा’सारख्या दहशतवादी संघटनांच्या तोडीस तोड अशा गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. प्रत्यक्ष हल्ला करणारे निराळे, त्यांना शस्त्रे देणारे निराळे,हत्येची योजना आखणारे निराळे, आणि कोणाची हत्या करायची, हे ठरविणारेही निराळेच आहेत. प्रत्येकाला त्याची जबाबदारी ठरवून दिलेली असते आणि त्यापलिकडे त्याला इतर काहीच माहिती नसते. त्यामुळेच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्या प्रकरणात अनेकांना अटक झाल्यानंतरही आजवर संपूर्ण कट उघडकीस येऊ शकलेला नाही.

तसंच गौरी लंकेश हत्येमध्ये सनातनसारख्या संघटनेची नेमकी कशी भूमिका होती, हे जाणून घेण्यासाठी आपण लवकरच कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, कर्नाटक एटीएसकडे पुरेसे पुरावे असतील तर त्यांनी गौरी लंकेश हत्येसाठी थेट सनातनविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी आम्ही करणार आहोत. त्याआधारे सनातनवर बंदी घालण्यासंदर्भात अधिक माहिती गोळा करण्याचा मानस असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.

अनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म

First published: August 20, 2018, 6:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading