Home /News /maharashtra /

विवाहबाह्य संबंधांच्या आरोपावर विद्या चव्हाणांच्या सुनेचं प्रत्युत्तर, म्हणाल्या...

विवाहबाह्य संबंधांच्या आरोपावर विद्या चव्हाणांच्या सुनेचं प्रत्युत्तर, म्हणाल्या...

ज्या व्यक्ती महिलांच्या प्रश्नासाठी लढतात त्यांनीच माझ्यावर असा अन्य़ाय केला आहे...

    मुंबई, 4 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार विद्या चव्हाण यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान विद्या चव्हाण यांनी सुनेचे विवाहबाह्य संबध असल्याचा आरोप केला आहे. यावर विद्या चव्हाण यांची सून पुढे आली असून त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपले विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा मी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा विद्या चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी माझ्याविरोधात पुरावे गोळा करुन बदनामी करण्याची धमकी दिली होती. आता त्यांनी नेमकं तेच केलं आणि माझ्याविरोधात कट रचला, असा आरोप विद्या चव्हाण यांच्या सुनेनं केला आहे. मला मुलगा झाला नाही म्हणून ते कुटुंबीय माझा छळ करायचे. माझ्या दीराने माझा मानसिक छळ केला आहे. मात्र मी आता गप्प बसणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मला घराबाहेर काढलं आणि माझ्या लहान मुलीपासून वेगळं केल्याचं त्यांनी सांगितलं. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी हा दावा केला आहे. ‘मी 16 जानेवारी रोजी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यानंतर 22 जानेवारी रोजी डिवी केस दाखल केली. ते मी केलेले आरोप मागे घेण्यासाठी माझ्याच मुलाचा वापर करीत आहे. ते मला माझ्या मुलीला भेटू देत नाही. सध्या कौटुंबिक न्यायालयाने 1 ते 6 या वेळात मला मुलीला भेटण्याची परवानगी दिली आहे. ते मला मुलीशी फोनवरही बोलू देत नाही. ज्या व्यक्ती महिलांच्या प्रश्नासाठी लढतात त्यांनीच माझ्यावर असा अन्य़ाय केला आहे’, अशी खंत विद्या चव्हाण यांच्या सुनेने व्य़क्त केली आहे. काय आहे प्रकरण? मुलीच्या पाठीवर मुलगाच हवा या हट्टासाठी सुनेचा छळ केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण यांच्यावर पती अभिजीत, त्यांचा मुलगा अजित (पीडितेचा नवरा), आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंदची पत्नी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण म्हणतात... विद्या चव्हाण यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोप फेटाळून लावले आहेत. विद्या चव्हाण यांनी त्यांच्या सुनेचे विवाहबाह्य संबध असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 'सुनेच्या मोबाइलमधील चॅट आणि इतर बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलाने यासंदर्भात पुरावे गोळा केले आणि त्याने घटस्फोटासाठी वकिलांशी संपर्क साधला', अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे. 'कायद्याचा चुकीचा वापर' विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या की, 'नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आलं आहे. माझ्य़ा दुसऱ्या नातीलादेखील मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. त्यामुळे मुलाला दुसरीही मुलगी झाली म्हणून माझ्यावर करण्यात आलेले हे आरोप चुकीचे आहेत. मी कायम महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं असून कायदा दुधारी शस्त्र आहे. त्यामुळे त्याचा गैरवापरही करण्यात येऊ शकतो. कायद्याचा कुणी चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी. कायदेशीर मार्गानं हा लढा सुरूच राहिल'. 16 जानेवारी रोजी एफआयआर विद्या चव्हाण यांच्याविरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध त्यांच्या सुनेने 16 जानेवारी रोजी एफआयआर दाखल केला होता. पण त्याची कोणतीच चौकशी झाली नाही. यावर पोलिसदेखील बोलण्यास तयार नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर भादंवि कलम 498 ए, 354, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: #Mumbai, NCP

    पुढील बातम्या