रत्नागिरी, 19 मार्च : आज खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली होती. या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी ही आजची सभा असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे या सभेमधून 'लाव रे तो व्हिडीओ'च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं जाणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ या सभेमध्ये दाखवले जाणार आहेत.
सभेमध्ये व्हिडीओ
मिळत असलेल्या माहितीनुसार या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी शरद पवार आणि काँग्रेस यांच्यावर जी टीका केली होती. त्या टीकेचे व्हिडीओ दाखवण्यात येणार आहेत. हे व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरे यांनी कशी टीका केली होती हे सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
रामदास कदमांचा निशाणा
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आज खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रामदास कदम बोलत होते. उद्धव ठाकरे हे अफजलखानासारखे माझ्यावर चालून आले, मला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे अफजलखानासारखे माझ्यावर चालून आल्याचं कदम यांनी म्हटलं आहे. कोकणी जनता कोणाच्या पाठीशी आहे हे पहावं, आजची सभा ही विरोधकांना प्रत्युत्तर असेल. उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी हेच खरे गद्दार आहेत. आज शिमगा होणार नसून ही सभा विकासाची आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणच्या विकासाची दिशा जाहीर करतील असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Eknath Shinde, Ratnagiri, Shiv sena, Uddhav Thackeray