प्रवीण मुधोळकर आणि भास्कर मेहरे,प्रतिनिधी
यवतमाळ,२२ आॅक्टोबर : उद्धव ठाकरे काय बोलतात, तेच कळत नाही. पैशाची कामं व्हायची असली की राजीनामे खिशात परत ठेवतात असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या आठवड्याभरापासून विदर्भाच्या पक्ष संघटनात्मक दौऱ्यावर आहे. आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या सरकारवर टीका केली. अमरावती जिल्ह्यातील माणसं भाजपच्या आमदाराचा चेहरा विसरले, कारण चार वर्षात आमदारांनी तिथे तोंड दाखवलं नाही असं राज ठाकरे म्हणाले.
मेळघाटातील शाळांमध्ये मराठी, मुलांना कोरकु भाषा येते आणि शिक्षक हिंदीत शिकवतात असं अमरावती जिल्ह्यातील वास्तव असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
हे सरकार राम मंदिराच्या मुद्द्याला हाताशी धरून दुष्काळाच्या मुद्द्याला बगल देत असल्याचा आरोप केला. काँग्रेसनंतर आता भाजप आणि शिवसेना सारखेच असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगत महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि सेनेला राम मंदिर आठवतो असा टोला लगावला.
यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेचाही खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे काय बोलतात, तेच कळत नाही. शिवसेनेची भूमिका ही नाटकी असून राजीनामा देण्याची नेहमी धमकी देतात. मात्र पैशाची कामे पूर्ण झाली की शिवसेना आपले राजीनामे खिशात ठेवतात असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिकमध्ये झालेलं काम हे गेल्या २५-३० वर्षात झालं नाही. मुख्यमंत्र्यांसारखं मी खोटं बोलत नाही. १ लाख २५ हजार विहिरी बांधल्या असं मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.
आता तेही नको आणि हेही नको अस सांगत एकदा माझ्या हातात सत्ता द्या असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.
==========================================
VIDEO: साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये पुन्हा जुंपली, तणावपूर्ण वातावरण