नरेंद्र मते, वर्धा 05 नोव्हेंबर: कधी कुठली घटना घडेल हे काहीच सांगता येत नाही. दररोज घरात देवासमोर आणि तुळशीजवळ दिवा लावणे ही परंपरा जवळपास सगळ्याच घरांमध्ये पाळली जाते. ग्रामीण भागात तर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा हा न चुकता लावला जातो. मात्र अशाच लावलेल्या दिव्यामुळे एका घरालाच आग लागल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली. त्याला कारण ठरला एक उंदीर. या उंदराच्या कारनाम्यामुळे घरचं जळून खाक झालं.
वर्धा जिल्ह्याच्या गिरड येथे ही घटना घडली आहे. या गावात कमलाबाई पाचरुटकर आपल्या लहानशा घरात राहतात. कमलाबाईंनी गुरूवारी सायंकाळी घरातल्या अंगणात असलेल्या तुळशी वृंदावनाजवळ दररोजच्या प्रथेप्रमाणे दिवा लावला. दिवा लावून कमलाबाई आपल्या घरकामाला लागल्या.
स्वयंपाक आणि इतर कामात त्या गढून गेल्या होत्या. मात्र याच वेळी घरातल्या एका कोपऱ्यात त्यांना काहीतरी जळत असल्याचं दिसलं. पाहता पाहता त्या ठिणगीचं रुपांतर आगीत झालं आणि मोठी आग लागली. आगीचे लोट भडकल्याने आजुबाजूचे लोक धावून आले. त्यांनी वृद्ध कमलाबाईंना आणि त्यांच्या मुलीला घरातून सुरक्षितपणे बाहेर काढले.
घरात सिलेंडर असल्याचं कमलाबाईंनी सांगितलं. त्यामुळे काही लोकांनी जीव धोक्यात घालून ते सिलेंडरही बाजूला करण्यात यश मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि दोन्ही मायलेकींचा जीव वाचला.
वर्धा: घरातल्या अंगणात तुळशीजवळ लावलेल्या दिव्याची पेटती वात उंदराने पळवली आणि अख्ख घर पेटलं. लोक मदतीला धावून आल्याने मायलेकींचा जीव वाचला. pic.twitter.com/1bca4PAAag
— News18Lokmat (@News18lokmat) November 5, 2020
नंतर आग का लागली याचा शोध घेतला असता लोकांना उंदराचा प्रताप कळाला.
उंदराने अंगणात तुळशीजवळ लावलेल्या दिव्याची पेटती वात पळवून नेली होती. ती वात अंगणातल्या कचऱ्यामध्ये पडली आणि आग भडकली आणि त्यात अख्ख घर जळून गेलं. सुदैवाने लोक धावून आल्याने माय-लेकींचा जीव वाचला.