Home /News /maharashtra /

नागपूरचा नवा महापौर कोण? उद्या होणार ऑनलाइन निवडणूक, भाजपकडून 'या' नेत्याने दाखल केला अर्ज

नागपूरचा नवा महापौर कोण? उद्या होणार ऑनलाइन निवडणूक, भाजपकडून 'या' नेत्याने दाखल केला अर्ज

Nagpur Election: महापौर आणि उपमहापौरपदाच्या उर्वरित कालावधीसाठी मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने सकाळी 11 वाजता निवडणूक होईल.

    नागपूर, 4 जानेवारी : नागपूर शहराच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी होणार आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या उर्वरित कालावधीसाठी उद्या ऑनलाईन पद्धतीने सकाळी 11 वाजता निवडणूक होईल. मनपा मुख्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही निवडणूक घेतली जाईल. नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी व उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांच्या पदाचा राजानामा दिल्यामुळे उर्वरित काळासाठी महापौर व उपमहापौरपदाची निवड करण्यासाठी ही निवडणूक होत आहे. भारतीय जनता पार्टीकडून महापौर पदासाठी नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी अर्ज दाखल केला आहे, तर उपमहापौर पदासाठी पक्षाकडून नगरसेविका मनीषा धावडे या मैदानात उतरल्या आहेत. नागपूरमध्ये का निर्माण झाली राजकीय अस्थिरता? काही दिवसांपूर्वी संदीप जोशी यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला. नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबतच्या संघर्षामुळे संदीप जोशी राज्यभर चर्चेत आले होते. नंतरच्या काळात तुकाराम मुंढे यांची बदलीही झाली. मात्र पुढे झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या संदीप जोशी यांचा पराभव झाला. विधानपरिषद निवडणुकीत मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागल्याने संदीप जोशी महापौरपदापासूनही दूर झाले. तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना महापौर विरुद्ध आयुक्त असा वाद झाला होता. या वादानंतर तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. तुकाराम मुंढे अडचणीत येतील यासाठी महापालिकेतून प्रयत्न केले जात होते. त्यानंतर नागपूरच्या जनतेनं निवडणूक निकालातून याचं उत्तर दिल्याची चर्चा झाली. संदीप जोशी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या महापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक होत असून या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Nagpur

    पुढील बातम्या