अमरावती, 21 ऑक्टोबर : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यात एका दलित महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. धारणी पोलीस याप्रकरणी तपास करताना दिरंगाई करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे, तर पीडित महिला बेपत्ता असल्याने तिचे अपहरण झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडितेच्या सासूने धारणी पोलिसांनकडे तक्रार दाखल केली. त्र पीडित महिलेची सुरक्षा पोलिसांनी केली नाही. पीडित महिला नेमकी कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर देखील पोलिसांकडे नाही.
धारणी तालुक्यातील महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आज पीडित महिलेच्या सासूची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली. या संदर्भात त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. चित्रा वाघ यांनी संतप्त होऊन पोलिसांची कानउघाडणी केली. मात्र पोलिसांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत तपासात हयगय करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
उस्मानाबादमध्येही महिला अत्याचाराच्या घटना
उस्मानाबादमध्ये गेल्या 10 दिवसात 2 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. उमरगा येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच लोहारा तालुक्यातील सास्तुर गावातही 4 अल्पवयीन तरुणांनी अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. यात पीडित मुलीची तब्येत बिघडल्याने तिला उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले आहे. घटना घडून 4 दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी उशीरा गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.