अमोल गावंडे,(प्रतिनिधी)
बुलडाणा,20 नोव्हेंबर: पुण्याजवळील दिवे घाटातील तिसऱ्या वळणावर मंगळवारी संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यामध्ये जेसीबी घुसून भीषण अपघात झाला होता. संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास (36) आणि अतुल महादेव आळशी (24) यांचा मृत्यू झाला आहे. यातील अतुल महादेव आळशी यांचेवर त्यांच्या शेगाव तालुक्यातील मूळगावी येऊलखेड गावात बुधवारी सकाळी शेकडो वारकर्यांच्या उपस्थितीत तर सोपान महाराज नामदास यांच्या पार्थिवावर आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अतुल महादेव आळशी हे बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात येणाऱ्या आदर्श गाव येऊलखेड येथील होते. वारकरीचे शिक्षण जिल्ह्यातच घेतल्यानंतर वारकरी संप्रदायातच पुढे शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या या युवा वारकऱ्याने जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे प्रवेश घेऊन मागील चार वर्षांपासून तेथेच आपली सेवा देत होते. घरात वृद्ध आईवडील, तीन बहीणी आणि एकुलता एक भाऊ असलेले हे महाराज मंगळवारी शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अनंतात विलीन झाले. त्यांचे पार्थिव पुण्यावरून त्यांच्या गावी सकाळी साडे आठ वाजता पोहोचले. शववाहिका गावात पोहोचताच संपूर्ण गाव अक्षरश: शोकसागरात बुडाले. या घटनेमुळे राज्यातील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या भीषण अपघातात 24 वारकरी जखमी झाले आहेत.
आपला एकुलता एक मुलगा आपण देवमार्गात दिला होता. आणि त्यानेच आम्हाला पोरकं केलं, आता पुढे त्याची मर्जी, अशा शब्दांत मृत अतुल महाराज यांच्या यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली.
कुटुंब झाले निराधार!
अतुल महाराज आळशी हे घरातील एकमेव कर्ता पुरुष होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्याकडे केवळ 2 एकर शेती असून ती शेतीही न पिकणारी असल्याने आळशी कुटुंब निराधार झाले आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी पाच लाख रुपयांची घोषणा झालेली आहे.