संघाच्या 'तरुण भारत'मधून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंवर खोचक टीका

संघाच्या 'तरुण भारत'मधून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंवर खोचक टीका

खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर घणाघात आरोप केले.

  • Share this:

प्रशांत मोहिते,(प्रतिनिधी)

नागपूर,14 डिसेंबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचाराच्या 'तरुण भारत' वृत्तपत्रातून भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी गोपीनाथ गडावर (परळी) पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी पक्ष आणि नेत्यांना टीकेचे लक्ष्य केले होते. आता या दोन्ही 'बंडखोर' नेत्यांना 'तरुण भारत'मधून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

'पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे अहंकारी आहेत. त्यांना अहंकारामुळे आपल्या पराभवाचे आत्मपरीक्षण करता येत नाही, असा टोला लगावण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांनी लोकांच्या मनातला मुख्यमंत्री, असे वक्तव्य केले होते, हे योग्य नाही. तसेच गोपीनाथ गडावर दोन्ही नेते राजकियदृष्ट्या अयोग्य बोलले, अशी टीका 'गोपीनाथ गडावरचे वारे' या अग्रलेखात केली आहे.

नाथाभाऊ पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहे, पंकजा मुंडे यांनीही तसेच मन बनवल्याची शक्यता आहे. एका पराभवाने पंकजा आणि एकनाथ खडसे सैरभैर झाले आहेत, असेही या लेखात म्हटले आहे. दरम्यान, 12 डिसेंबरला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर (परळी) मनातील खदखद बोलून दाखवली होती. एवढेच नाही तर भाजप नेतृत्वावर टीका केली होती.

परळीत काय म्हणाल्या पंकजा..

पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ गडावर वडिलांच्या जन्मदिनी मोठी सभा घेतली. चंद्रकांत पाटील या सभेला उपस्थित होते. त्यांच्यासमोरच एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षावरील नाराजी बोलून दाखवली होती. खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर घणाघात आरोप केले. नंतर पंकजा यांनीही मन मोकळं केलं. त्या म्हणाल्या, मन मोकळं केलं नाही तर शरीरात त्याचं विष बनतं. आपण पक्ष सोडून जाणार नाही, हे स्पष्ट करताना पंकजा यांनी एक मोठा इशाराही दिला. मी पक्षात राहून संघर्ष करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. चेंडू आता भाजपच्या कोर्टात आहे, असे सांगताना त्या म्हणाल्या, मी बंड करणार असल्याच्या बातम्या कुणी पेरल्या, ते शोधून काढावं. भाजप सोडणार नाही, असं सांगत असतानाच त्यांनी 26 जानेवारीला गोपिनाथ प्रतिष्ठानचे कार्यालय मुंबईत सुरू करणार असल्याची घोषणा केली. मी मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार, असेही पंकजा यांनी यावेळी जाहीर केले.

खदखद असेल तर योग्य ठिकाणीच मांडली पाहिजे..

गोपीनाथगडावर झालेल्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये अन्याय होत असल्याची खदखद व्यक्त केली. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. "एकनाथ खडसेंनी अशा प्रकारे त्यांनी बोलायला नको होतं. ते व्यासपीठ त्यासाठी नव्हतं", असं फडणवीस म्हणाले. आपलं तिकीट का कापलं असा एकनाथ खडसे यांचा प्रश्न असेल, तर त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला विचारावं. त्यांना तिथून उत्तर मिळेल, असंही ते म्हणाले.

'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी मुंडे आणि खडसे यांच्या पक्ष सोडून जायच्या चर्चांवर भाष्य केलं. पक्ष एकसंघ राहील, हा विश्वास आहे, असं माजी मुख्यमंत्री म्हणाले. भाजपमध्ये ओबीसींवर अन्याय होत नाही. हा ओबीसींचाच पक्ष आहे, असं ते म्हणाले. खडसेंबद्दल किंवा ओबीसी समाजाबद्दल राग असता तर त्यांच्या मुलीला पक्षाने तिकीट दिलंच नसतं, असंही ते म्हणाले.

खडसेंवर आरोप झाले म्हणून त्यांना राजीनामा द्यायला लावला हे खोटं आहे. पक्ष म्हणून मी त्यांच्या पाठिशी होते. कुण्या एका संशयित आरोपीच्या सांगण्यावरून तर खडसे यांना नक्कीच काढलं गेलेलं नाही. खडसेंवर आरोप लागले, त्यानंतर मी तातडीने त्याच्या चौकशीचे आदेश ATS ला दिले आणि 12 तासात एटीएसने तो आरोप खोटा आहे हा रिपोर्ट दिला. एटीएसने एकनाथ खडसेंना क्लीन चीट दिली. पण कसं आहे, पराभवाची चर्चा जास्त होते. पक्षाला जिंकून देखील हरावं लागलं त्यामुळे जास्त चिंतन केंद्रीय नेतृत्वाने दिलं. खडसेंना तिकीट देणं न देणं हा केंद्रीय नेतृत्वाने हा निर्णय होता. तिकीट का कापलं याचं कारण एकनाथ खडसेंना हवं असेल तर केंद्रीय नेतृत्व ते कारण देईल. पण पक्षात श्रेष्ठींकडे तक्रारी करता येतात. खदखद होती, तर योग्य ठिकाणी व्यक्त करायला हवी होती, असं फडणवीस म्हणाले.

'पंकजाताईंच्या मी कायम पाठीशी'

मुंडे साहेबांचं स्मारक आम्ही बांधलं नाही हे चूक आहे. स्मारकाचं डिझाईन पूर्ण व्हायला वेळ लागला. मुंडेंच्या कामावर जे सरकार तयार झालं होतं, त्याच म्हणजे आमच्या सरकारने त्यासाठी आधीच 45 कोटी रुपये दिले आहेत. त्याच्या कामाची सुरुवात होतेय, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पंकजाताईंच्या पाठीशी नेहमी उभा होतो, असं ते म्हणाले.

Published by: Sandip Parolekar
First published: December 14, 2019, 2:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading