नागपूर 8 नोव्हेंबर: नागपूर जवळच्या वाडी इथं पोलिसांनी ‘सेक्स रॅकेट’ उद्धवस्त केलं आहे. एका सोसायटीमध्ये पती-पत्नीच हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं आहे. आपल्याच घरात हे दोघे हा गैरप्रकार चालवत होते. अनेक दिवस आजुबाजूंच्या लोकांना याची काहीही माहिती नव्हती. मात्र या घरी जाणं-येणं वाढल्याने लोकांना त्याचा संशय यायला लागला आणि त्यातून हे रॅकेट अखेर उघडकीस आलं.
वाडी परिसरात एका चांगल्या सोसायटीमध्ये हे दाम्पत्य राहत होते. तिथेच त्यांनी मुली पुरवण्याचा हा धंदा सुरू केला. पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी आधी प्राथमिक माहिती गोळा केली. हे दाम्पत्य सेक्स रॅकेट चालवत असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी सापळा रचला. एक बनावट ग्राहक तयार करून त्याने पैसेही ठरवले. त्यानुसार पैसे दिल्यावर त्यांनी एका तरुणीला पाठवलं.
त्यानंतर बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा घातला आणि त्या तरुणीसह त्या दोघांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्या तरुणीची त्या दलदलीतून सुटका केली आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गैर प्रकार सुरू असल्याचं बोललं जात आहे.
ग्राहक मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग केल्या जात असल्याचंही पोलिसांना आढळून आलं आहे. पोलीस आता त्या दाम्पत्याची चौकशी करत असून मोठं रॅकेड उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक इंटरनेवर साईट्सवर अशी रॅकेट्स चालवली जातात. पोलिसांनी अशा काही साईट्सबंदही केल्या आहेत. मात्र त्या बंद झाल्या की नव्या नावांनी त्या सुरू केल्या जातात.
त्यामुळे पोलिसांसमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. लॉकडाऊनच्या काळात रोजगार गेल्यामुळे अनेक मुली या दलालांच्या जाळ्यात फसल्याची भीतीही सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.