नागपूर, 12 ऑक्टोबर : नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ३५ मध्ये एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपचे संदीप गवई ४६३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ५७११ मते पडली तर काँग्रेसचे पंकज थोरात यांना ५२४८ मते पडलीत. या प्रभागातील नगरसेवक निलेश कुंभारे यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात येणाऱ्या या प्रभागातील निवडणूकीकडे शहराचं लक्षं लागलं होतं.
संदीप गवई यांना काँग्रेसच्या पंकज थोरातांनी खरंतर जोरदार टक्कर दिली. पण ते विजयश्री खेचून आणण्यात अपयशी ठरले. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार थोरात यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली पण निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष पांडे यांनी ती अमान्य केली. संदीप गवई यांच्या विजयामुळे नागपुरातल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करून विजयोत्सव साजरा केला.