चंद्रपूर, 27 जुलै : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस. राज्यासह देशभरातील अनेक दिग्गजांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. मात्र अशातच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेनंही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधत एक अनोखं आंदोलन केलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज केक कापून आणि मिठाई वाटून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा वाढदिवस महावितरणच्या मुख्य कार्यालयात साजरा करण्यात आला. मात्र हा वाढदिवस म्हणजे मनसेच्या आंदोलनाचा एक भाग होता.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना विजेची भरमसाठ बिलं आली आहेत. मात्र ऊर्जामंत्री नितीन राऊत उलटसुलट वक्तव्य करून लोकांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वीज बिलात दिलासा देण्याची मागणी करत त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे.
हेही वाचा -'माझी जेलमध्ये जाण्याची तयारी आहे', प्रकाश आंबेडकरांची पुन्हा आक्रमक भूमिका
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वांद्रे येथील मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांचे अभीष्टचिंतन केले. तसंच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.