राज्यात युती तुटली.. पण सुधीर मुनगंटीवाराच्या शहरात शिवसेनेची भाजपला साथ

राज्यात युती तुटली.. पण सुधीर मुनगंटीवाराच्या शहरात शिवसेनेची भाजपला साथ

दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि माजी केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या समर्थक नगरसेवकांंनी भाजपचा हा गड कायम राखला.

  • Share this:

हैदर शेख,(प्रतिनिधी)

चंद्रपूर, 22 नोव्हेंबर: राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला आहे. असे चित्र असताना मात्र, चंद्रपूर महापालिकेत शिवसेनेने भाजपला साथ दिली आहे. भाजपच्या राखी कंचर्लावार यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली आहे तर राहुल पावडे यांचा उपमहापौरपदी विजय झाले आहे.

चंद्रपूर शहर महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक गांधी चौकातील महात्मा गांधी भवनात शुक्रवारी सकाळी झाली. राणी हिराई सभागृहात सर्वप्रथम महापौर निवडणुकीतील काँग्रेसच्या सुनीता लोढीया यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत थेट लढत ही भाजपच्या राहुल पावडे आणि काँग्रेसचे अशोक नागापुरे यांच्यात होणार हे अर्ज माघारीनंतर निश्चित झाले.

पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी डॉ.कुनाल खेमनार यांनी बैठकीचे संचालन केले. यात भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांना 42 मत मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कल्पना लहामगे यांना 22 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विद्यमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांची लढत काँग्रेसच्या अशोक नागापुरे यांच्याशी झाली. येथेही 42 विरुद्ध 22 मतांनी भाजपचा विजय झाला. चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तागट नव्या महापौरपदाच्या उमेदवारी बद्दल नाराज असल्याच्या वार्ता होत्या. त्यासाठी या सर्व नगरसेवकांना पेंच आणि नंतर ताडोबातील रिसॉर्टमध्ये पर्यटन घडवण्यात आले. भाजपला आपला स्वतःचा गट एकत्र ठेवण्यात यश मिळाले असून त्यामुळे शहर मनपावर भाजपचा पुन्हा एकदा झेंडा रोवला गेला आहे. दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि माजी केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या समर्थक नगरसेवकांंनी भाजपचा हा गड कायम राखला. नवनिर्वाचित महापौर राखी कंचर्लावार यांनी शहर विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी भावना व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading