राज्यातली मोठी धरणं भरली, पाण्याचा विसर्ग सुरू

राज्यातली मोठी धरणं भरली, पाण्याचा विसर्ग सुरू

राज्यात पावसाने पुन्हा सर्वदूर जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे राज्यातली प्रमुख धरणं तुडुंब भरून वाहू लागलीत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणा-या पावसामुळे धरणाचे 6 वक्री दरवाजे एक फूटाने उघडण्यात आलेत. कोयना धरणातून सध्या 9 हजार 287 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : राज्यात पावसाने पुन्हा सर्वदूर जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे राज्यातली प्रमुख धरणं तुडुंब भरून वाहू लागलीत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळणा-या पावसामुळे धरणाचे 6 वक्री दरवाजे एक फूटाने उघडण्यात आलेत. कोयना धरणातून सध्या 9 हजार 287 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने, खडकवासला साखळी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर आलाय. तिकडे मावळमध्ये धुव्वाधार पाऊस पडत असल्याने पवना धरणातून पाणी सोडण्यात आलंय. या दोन्ही धरणांचं पाणी पुढे सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणात जाऊन मिळतंय. उजनीचाही विसर्ग वाढवावा लागणार आहे. उजनी धरण यापूर्वीच 117 टक्के भरलंय.

जायकडवाडी धरणाचा पाणीसाठाही 90 टक्क्यांच्या आसपास पोहोचतोय, त्यामुळे येत्या दोन दिवसात हे धरणही भरून वाहू लागेल. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातली बुहतांश धरणं यापूर्वीच 100 टक्के भरलीत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातल्या पावसाचं पाणी आता गोदावरी मार्गे जायकवाडीत धरणात जमा होतंय.

कोल्हापुरातही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरण शंभर टक्के भरलंय. वारणा धरणही शंभर टक्के भरलंय. तिकडे सांगलीतही चांदोली धरण फुल्ल झालंय.

पालघरमध्ये सूर्या नदीवरील धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आलेत. या धरणातून 5 हजार 600 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर पालघरमधील कावादास धरणातून 18 हजार 800 विसर्ग सुरू आहे. थोडक्यात मुंबई, पुणे, औरंबाद या शहरांना पाणी पुरवठा करणारी सर्व लहानमोठी धरणं भरल्याने किमान या प्रमुख शहरांचा पाणी प्रश्न सुटल्यात जमा आहे. तसंच राज्यातल्या कृषी सिंचनालाही या प्रमुख धरणांमधील वाढीव जलसाठ्याचा मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, विदर्भात मात्र, अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही त्यामुळे तिथली धरणं भरणं अजूनही बाकी आहे. वेधशाळेनं मात्र, येत्या 24 तासात विदर्भात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवलाय. ओरिसात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा विदर्भात पाऊस पडायला फायदा होणार आहे.

First published: September 20, 2017, 8:21 PM IST

ताज्या बातम्या