शरद पवारांना मुख्यमंत्री करा, काँग्रेसच्या आमदाराचा प्रस्ताव

शरद पवारांना मुख्यमंत्री करा, काँग्रेसच्या आमदाराचा प्रस्ताव

शरद पवार सोमवारी दिल्लीला जात असून सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

  • Share this:

संजय शेंडे, अमरावती 3 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापन करण्यावरून धुमशान सुरू असताना वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. रोज नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मात्र यात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी आज नवा प्रस्ताव ठेवला. शरद पवारांना मुख्यमंत्री बनवलं तर काँग्रेस त्याला पाठिंबा देईल असं ठाकूर यांनी सांगितलं. यशोमती ठाकूर या राहुल गांधी यांच्या जवळच्या वर्तुळातल्या नेत्या आहेत. या आधीही शरद पवारांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आला होता. त्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातल्या यावली येथे  अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतात पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्या शेतकऱ्यांना सावरण्याचं सोडून मुख्यमंत्री फक्त सत्ता स्थापन करण्यात मश्गूल आहे अशी टीकाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री आणि शरद पवार सोमवारी दिल्लीत

राज्यातल्या अस्थिर राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उद्या म्हणजे सोमवारी राजधानी दिल्लीत जाणार आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. मुख्यममंत्र्यांच्या दौऱ्याचं कारण हे शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी म्हणून मदत मागण्यासाठी असल्याचं सांगितलं जातंय. मात्र सत्तावाटपाची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री अमित शहांशी (Amit Shah) चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. गेल्या 9 ते 10 दिवसांपासून राज्यात सत्तेतल्या वाटणीवरून पेच निर्माण झालाय. भाजप मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही तर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवच अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे कोडीं फुटणार कशी असा प्रश्न निर्माण झालाय. तर यावर राज्यातच तोडगा निघावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची इच्छा आहे.

...तर भाजप शिवसेनेला मुंबई महापालिकेत धक्का देणार

कोंडी फोडण्यासाठी काही राज्यातूनच तोगडा निघावा, गरज पडली तरच दिल्लीतून मदत करण्याची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. मात्र चर्चेलाच सुरूवात होत नसल्याने गाडी पुढे कशी जाणार असा प्रश्न विचारला जातोय. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात दररोज नव नवे तोडगे आणि शक्यतांची चर्चा होतेय. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी हरियाणासाठी पुढाकार घेतला तसाच महाराष्ट्रासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं.

'मला नुकताच संजय राऊतांचा मेसेज आला', अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री दिल्लीत जात असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही सोमवारी दिल्लीत असून ते काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून शिवसेनेला पाठिंबा द्यावा या प्रस्तावावरही चर्चा सुरू आहे. आम्ही विरोधी बाकांवर बसणार असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सांगत असले तरी राजकारणात काहीही घडू शकते त्यामुळे या भेटीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 10:21 PM IST

ताज्या बातम्या