चंद्रपूर, 03 फेब्रुवारी: ज्या वर्गात आयुष्याचे धडे गिरवले, ज्या वर्गात भविष्याची स्वप्नं रंगवली, त्याच वर्गात एका १२ वीच्या विद्यार्थ्यानं गळफास लावून आयुष्य संपवलं. परीक्षेच्या ऐन तोंडावर विद्यार्थ्यानं केलेल्या या आत्महत्येनं महाराष्ट्र सुन्न झालाय.
निखिल बुरांडे हा विद्यार्थी ब्रम्हपुरी तालुक्यातल्या चौगानमधल्या कृषक कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या कला शाखेत शिकत होता. सोमवारी पहाटे निखिलनं कॉलेजच्या वर्गातच गळफास लावून आयुष्य संपवलंय. त्याच्या आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालं नसलं तरी निखिलनं आत्महत्या केलेल्या वर्गातल्या बोर्डवर जे लिहिलंय ते वाचणारा प्रत्येकजण नि:शब्द होत आहे.
निखिलला त्याच्या आयुष्यातल्या एकटेपणानं, नैराश्यानं ग्रासलं होतं, त्यातूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी शक्यता आहे. निखिलनं गळफास घेतलेल्या वर्गातल्या बोर्डवर काही मजकूर लिहिला होता. बोर्डवर मोठ्या अक्षरात ‘Alone’ अर्थात एकटा असं लिहिलेलं सापडलं. डाव्या बाजूला ‘मी परफेक्ट नाही, पण मी प्रामाणिक आहे.’ असं लिहिलं होतं. तर उजव्या बाजूला मला जगण्याची इच्छा नाही असा मजकूर होता. एवढंच नाही तर बोर्डवर सगळ्यात खाली मुख्याध्यापकांची माफी मागत, ‘मी आयुष्य संपवत आहे', असं लिहिलं गेलंय.
बोर्डवरचा हा मजकूर निखिलनंच लिहिला का? आणि त्याच्या आत्महत्येचं खरं कारण काय? याचा तपास पोलीस करत आहेत. पण परीक्षेच्या तोंडावर निखिलनं हे टोकाचं पाऊल उचलल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. निखिल सारख्या हुशार मुलाला नेमक्या कुठल्या नैराश्यानं ग्रासलं असावं? परीक्षेचा ताण त्याला असह्य झाला की, त्याच्यावर कुठला अन्याय झाला? असे अनेक प्रश्न आज तरी अनुत्तरित आहेत. एकटा असं त्यानं का लिहिलं, हेसुद्धा कशामुळे ते उलगडलेलं नाही.
स्पर्धेच्या युगात मार्कांची लढाई अत्यंत तीव्र झाली. स्पर्धेच्या तणावातून मुलं नैराश्याच्या गर्तेत ढकलली जात आहेत. त्यातूनच मुलं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताहेत ही पालक, शिक्षकांसह आपल्या समाजासमोरची मोठी चिंता आहे.
अन्य बातम्या
भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतूनही बाहेर
खून करून ‘दृश्यम’ स्टाइलने लपवला मृतदेह, प्रेयसीच्या पतीची हत्या करणारा गजाआड
महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरलाच नाही, भर चौकात तरुण शिक्षिकेला जिवंत जाळलं