खा. नाना पटोलेंनी थेट मोदींवर शरसंधान साधल्याने भाजपमध्ये खळबळ !

खा. नाना पटोलेंनी थेट मोदींवर शरसंधान साधल्याने भाजपमध्ये खळबळ !

भंडाऱ्याचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी नागपुरात बोलताना थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ माजलीय. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणालाही उत्तर देण्याची सवय नाही. त्यामुळे ते खासदारांवर संतापतात, '' असं सनसनाटी विधान नाना पटोलेंनी काल नागपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना केलं आणि भाजपमधला पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आलाय.

  • Share this:

नागपूर, 2 सप्टेंबर : भंडाऱ्याचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी नागपुरात बोलताना थेट पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ माजलीय.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणालाही उत्तर देण्याची सवय नाही. त्यामुळे ते खासदारांवर संतापतात, '' असं सनसनाटी विधान नाना पटोलेंनी काल नागपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना केलं आणि भाजपमधला पक्षांतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आलाय. या कार्यक्रमात पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट टीकास्त्र सोडल्याने भाजपमधला फडणवीस-गडकरी गटाचा वादही पुन्हा उफाळून आलाय.

खा. नाना पटोले म्हणाले, ''मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच राज्यातही नैसर्गिक साधन-संपत्ती मुबलक आहे, असे असूनही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला सगळ्यात कमी निधी केंद्राकडून दिला जातो. केंद्राकडून जास्त निधी आणण्याची धमक मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. संसदेचे अधिवेशन होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि राज्यातील खासदारांची बैठक होत असते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे बैठक घेण्याची पद्धतच संपवून टाकली आहे, मुख्यमंत्री विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो की पश्चिम महाराष्ट्रातला, मुंबईत गेला की त्याची मानसिकता बदलते, ''

गडकरी गटाचे मानले जाणाऱ्या नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. कर्जमाफीच्या मुद्यावरूनही नाना पटोलेंनी गेल्याच महिन्यात मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे टार्गेट केलं होतं. त्यावेळी नाना पटोले म्हणाले होते, ''कर्जमाफीची घोषणा करून १ महिन्याचा कालावधी लोटला मात्र अजूनही काहीही झालेले नाही. शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी सक्ती केली आहे ती चुकीची व्यवस्था आहे. आमचा शेतकरी या व्यवस्थेपर्यंत अजून पोहोचलाच नाही. त्यामुळे बँकेकडून माहिती मागवून शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी कारण शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे आणि ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकारने संवेदनशील व्हावे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी,'' असं सांगत घरचा आहेर दिला होता.

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडूनही काही होत नाही म्हटल्यावर मग आता त्याच नाना पटोलेनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच तोफ डागलीय. पटोले म्हणतात, ''लोक मला म्हणतात, नाना, तुमच्याकडे मंत्रिपद यायला हवे होते पण मोदींच्या कारभारात मंत्री घाबरलेले असतात, मंत्र्यांची काय स्थिती आहे हे आपण पाहतो आहोत, त्यामुळेच मला मंत्रिपद नको आहे,'' अर्थात नाना पटोलेंच्या या टीकेला पंतप्रधानांच्या खासदार बैठकीतील कानउघडणीचाही संदर्भ असल्याचं बोललं जातंय.

महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नाना पटोलेंनी ओबीसी आणि कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करताच नरेंद्र मोदींनी त्यांनाच झापलं होतं म्हणे. त्याचीच खदखद मनात असलेल्या पटोले यांनी, मोदी उत्तर न देता उलट खासदारांनाच प्रश्न विचारत सुटतात असे म्हटले आहे. आम्ही प्रश्न विचारले की, तुम्हाला शासनाच्या योजनाही ठाऊक नाहीत, तुम्ही पक्षाचा जाहीरनामा वाचला नाही का? असे प्रश्न विचारून आम्हाला पंतप्रधानांकडून शांत केले जाते, असेही पटोले म्हणालेत.

पटोले - पटेल वादाची किनार

नाना पटोलेंच्या या विधानाला प्रफुल्ल पटेल आणि मोदींच्या मैत्रीचाही संदर्भ दिला जातोय. भंडाऱ्यात नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. पण तरीही मोदी प्रफुल्ल पटेल यांना जवळ करतात कदाचित त्यामुळेच नाना पटोलेंनी मोदींवर ही भडास काढल्याचं बोललं जातंय. हे झालं प्रफुल्ल पटेलाचं...

गडकरी - फडणवीस गटातला सुप्त संघर्ष

खा. नाना पटोलेंच्या या वादग्रस्त विधानाला गडकरी - फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या सुप्त संघर्षाचाही संदर्भ जोडला जातोय. कारण नाना पटोले हे गडकरी गटाचे समर्थक मानले जातात. आणि गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू होत्या. पण मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन पुन्हा आपला खुट्टा बळकट करून घेतल्याने त्याचं पुढे काहीच झालं नाही. त्यामुळे त्याच वादाचा हा पुढचा अंक तर नाही ना, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, आपल्या विधानावरून भाजपमध्ये मोठं वादंग निर्माण होताच नाना पटोलेंनी आपल्या विधानावरून घुमजाव केलंय. मी असं म्हणालोच नव्हतो असा दावा त्यांनी केलाय.

First published: September 2, 2017, 12:21 PM IST

ताज्या बातम्या