प्रवीण मुधोळकर,(प्रतिनिधी)
नागपूर,28 सप्टेंबर: तुमसर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात 18 सप्टेंबरला विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर झालेल्या चौकशीत गुन्हा सिद्ध झाल्याने आमदार चरण वाघमारे यांनी शनिवारी सकाळी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर तुमसरसह परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम 16 सप्टेंबरला रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यावेळी नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तेथे उपस्थित एका गर्भवती महिलेला अशा परिस्थितीत घरी कशी जाणार असे विचारले. त्यावर तेथे उपस्थित भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याला असभ्य भाषेचा उपयोग केला. त्यानंतर महिला अधिकाऱ्याने असे न बोलण्याची विनंती केली. मात्र, जिभकाटे यांनी त्यांच्याशी भांडण सुरू करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर आमदार चरण वाघमारे देखील तेथे आले. त्यांनीही महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
हात पकडून धक्का दिला..
पीडित महिला अधिकारीने बुधवारी (18 सप्टेंबर) सायंकाळी आमदार चरण वाघमारे आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याचा हात पकडून धक्काही दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी आमदार आणि शहराध्यक्षाविरुद्ध कलम 353, 354, 472, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या आमदारावर महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने यांच्या उमेदवारीवर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि विरोधकांनाही आयते कोलीत मिळाले आहे.
पवार कुटुंबात खरंच गृहकलह? मनोहर जोशी काय म्हणाले, पाहा UNCUT VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा