'थ्री इडियटम'ध्ये करीना कपूर परत येते तसं शिवसेनाही येईल, मुनगंटीवारांची टोलेबाजी

'थ्री इडियटम'ध्ये करीना कपूर परत येते तसं शिवसेनाही येईल, मुनगंटीवारांची टोलेबाजी

'शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतः चिंतामुक्त व्हावं कारण मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावर असलेला टवटवीतपणा गेलाय.'

  • Share this:

विवेक कुलकर्णी, नागपूर 18 डिसेंबर : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस गाजला तो भाषणांनी. राज्यपालांच्या भाषणावर धन्यवाद प्रस्ताव आज मांडण्यात आला. त्यावर सर्वच पक्षांनी केलेली भाषणं टोलेबाजींनी चांगलीच गाजली. निवडणुकीपर्यंत सोबत असलेली शिवसेना निकालानंतर सोडून गेली आणि भाजपच्या हातातून सत्ता निघून गेली. त्याचं शल्य अजूनही भाजपला बोचतं आहे. यावेळी बोललेल्या भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी आपल्या भाषणातून शिवसेना सोडून गेल्याचं दु:ख व्यक्त केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामुळे अनेकदा वाद निर्माण झाले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चकमकीही झाल्या. नंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं भाषणही लक्षवेधी ठरलं.

मुनगंटावार म्हणाले, गेल्या 5 वर्षात उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कर्जमुक्तीच्या दिशेनं राज्याला नेलं. सत्तेचा वैचारिक आधार केवळ खुर्ची असू शकत नाही. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतः चिंतामुक्त व्हावं कारण मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावर असलेला टवटवीतपणा गेलाय. हे डेप्युटेशनवर असलेलं सरकार आहे.

उद्धव ठाकरेंची डिनर डिप्लोमसी, भाजपच्या आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण

जो सत्तेत न अडकता त्याचा त्याग करतो तो आमचा आदर्श. सुधीर मुनगंटीवारांनी 'उद्धवा अजब तुझे सरकार' या गाण्याचाही उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, थ्री इडियट या चित्रपटात करीना कपूर परत येते, तसे आम्ही आणि शिवसेना परत एकत्र येऊ. त्यामुळे मी शिवसेनेवर जास्त बोलत नाही असं त्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पीकला.

फडणवीस काय म्हणाले?

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलायला उभा राहिलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' या दैनिकातील काही जुने संदर्भ वाचून दाखवले. सामना दैनिकातून शरद पवार यांच्यावर निवडणुकीआधी आक्रमक शब्दांत टीका करण्यात आली होती. त्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधून घेतलं.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत 20 डिसेंबरपासून 'शरदोत्सव'

'शरद पवार अफजल खान आहेत. शरद पावर महाराष्ट्राचे शत्रू आहेत. शरद पवार बकासूर आहेत,' अशा आशयाच्या सामनातील बातम्या देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार हे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर हरकत घेतली. सभागृहात वर्तमानपत्र पुरावा म्हणून वाचता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असताना म्हणाले होते, अशी आठवण धनंजय मुंडे यांनी करून दिली.

अमित शहांचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल, शरद पवारांबद्दलही केलं भाष्य

'ते' शब्द अध्यक्षांनी रेकॉर्डमधून वगळले

देवेंद्र फडणवीस यांनी सामनातून वाचून दाखवलेले शब्द महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्याचा अपमान करणारे आहेत, अशी भूमिका घेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या रेकॉर्डमधून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल वाचून दाखवलेले शब्द वगळले. त्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2019 05:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading