'आरे' खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा घाट, भाजप नेत्याचा आरोप

'आरे' खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा घाट, भाजप नेत्याचा आरोप

आशिष शेलार यांच्यासह अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांनी आक्रमकपणे आरेतील भूखंड हडप करण्याचा हा डाव असल्याचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेच्या या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला.

  • Share this:

नागपूर,19 डिसेंबर:आरेला जंगल घोषित करू, असे आश्वासन दिलेल्या शिवसेनेने सत्तेत आल्यावर मुंबईकरांच्या मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्याच शिवसेनेने आता आरेतील आदिवासीपाडे स्थलांतरित करून हा पट्टा निवासी करून खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप माजी शालेय शिक्षण मंत्री आणि भाजपचे आमदार अॅड.आशिष शेलार यांनी केला आहे.

विधानसभेमध्ये गुरूवारी पुरवणी मागण्यांवर बोलताना शिवसेना सदस्य रवींद्र वायकर यांनी अशी भूमिका मांडली. आरेमधील आदिवासी पाडे व विविध ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकामे पुनर्विकासित करण्यासाठी आरे मधील एका मोठ्या भूखंडावर विकास आराखड्याअंतर्गत निवासी आरक्षण करून या पट्ट्यातील घरांना पुनर्विकासित करावे. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासह अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांनी आक्रमकपणे आरेतील भूखंड हडप करण्याचा हा डाव असल्याचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेच्या या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला.

याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, आरेमध्ये जे आदिवासी पाडे आहेत, येथील लोकांना सोई सुविधा देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना चांगले रस्ते पाणी, वीज, आरोग्याच्या सोई सुविधा, पक्की घरे मिळालीच पाहिजेत सोबत त्यांच्या संस्कृती व कलेचे जतन ही झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मात्र आदिवासींच्या नावावर त्यांना स्थलांतरी करून त्यांच्या जमिनी विकासकांना देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल तर तो आम्ही हाणून पाडू. मुंबईकरांसाठी आवश्यक असणाऱ्या मेट्रो कारशेडचे काम ज्या शिवसेनेने बंद पडले त्या शिवसेनेचे सदस्य आरेतील भूखंड निवासी करा, अशी मागणी करीत आहेत. हा आरेतील भूखंड खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असेल तर तो आम्ही हाणून पडू, असा इशाराही आमदार आशिष शेलार यांनी दिला.

Published by: Sandip Parolekar
First published: December 19, 2019, 9:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading