अमरावती, 2 मार्च : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे राष्ट्रीय सेवा योजनांच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली होती. शपथ देणाऱ्या शिक्षकांना या प्रकरणी निलंबित देखील करण्यात आले. महिला महाविद्यालयातील शिक्षकांचे निलंबन मागे घेण्यासाठी विद्यार्थिनी महाविद्यालयासमोर आंदोलन करत असताना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी विद्यार्थिनी प्रियकरासोबत पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असून एका युवकाने फूस लावून आपल्या मुलीला पळवून नेल्याची फिर्याद आईने दाखल केली आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय दिली होती शपथ?
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयीन जीवनात मुला मुलींचे प्रेम प्रकरणाचे सूत जुळते आणि याच प्रेम प्रकरणाचे रूपांतर लग्नात होते. रोज प्रेम प्रकरणात होत असलेल्या अत्याचार, खून यावर मात करण्यासाठी अमरावतीच्या टेंभुर्णी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबीरात मुलींनी शपथ देण्यात आली होती. हिंगणघाट घटनेतील पीडितेला श्रद्धांजली देत महाविद्यालयीन तरुणीनी "प्रेम, प्रेमविवाह न करण्याची आणि हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न न करण्याची शपथ दिली होती.
प्राध्यापकांचं निलंबन
'प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची' शपथ देणारे प्राचार्य आणि दोन प्राध्यापकांना निलंबित केलं आहे. परंतु, शपथ देणाऱ्या शिक्षकांचं निलंबन मागे घ्यावं यासाठी विद्यार्थिंनीच आंदोलन करत आहे.
निलंबनानंतर माफीनामा
महिला आणि कला महाविद्यालयाच्या रासेयो पथकाच्या टेंभुर्णी येथील निवासी विशेष शिबिरात शिबिरार्थी विद्यार्थिनींना 'प्रेम व प्रेमविवाह न करण्याची' शपथ एका सत्रात देण्यात आली होती. त्यावर मीडिया आणि सोशल मीडियातून काही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या प्रतिक्रिया लक्षात घेता शिबिरात दिलेली शपथ ही उन्मादी प्रेमाच्या विरोधात होती, असं म्हणत महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र हावरे आणि प्राध्यापक प्रदीप दंदे यांनी माफीनामा सादर करत दिलगिरी व्यक्त केली.