मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गावासाठी जिवाची बाजी लावणाऱ्याला मृत्यूने गाठलं, क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

गावासाठी जिवाची बाजी लावणाऱ्याला मृत्यूने गाठलं, क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

अकोला, 18 ऑक्टोबर : विद्युत खांबावर दुरुस्ती करताना वीजप्रवाह सुरूच असल्याने विजेचा धक्का बसून खासगी वायरमनचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज रविवारी मांजरी येथे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. बळीराम काशिराम वाघमारे वय (56) असं मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे. बळीराम हा अनेक वर्षांपासून गावात वीज जोडणी व दुरुस्तीचे काम करतो. आज सकाळच्या सुमारास गावातील एका व्यक्तीच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे तो खांबावर चढला. खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना तारेत वीजप्रवाह सुरू असल्याने विजेचा जोरात धक्का लागून तो जागीच ठार झाला. विशेष म्हणजे बळीरामचे कुटुंबीय त्याला सोडून बाहेर गावी राहत असल्याने तो एकटाच मांजरी येथे राहत होता. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला आहे. या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळून वीजप्रवाह खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशावेळी वायरमन जीवाची बाजी लावत वीजप्रवाह सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं या घटनेनंतर अधोरेखित होत आहे.
First published:

Tags: Akola

पुढील बातम्या