धक्कादायक.. अर्थमंत्र्यांच्या चंद्रपुरात 108 रुग्णवाहिकेतून अवैध दारूची तस्करी

आरोग्यदृष्ट्या संकटात सापडलेल्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात सुरू केलेल्या 108 या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अवैध दारु तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरात उजेडात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 03:48 PM IST

धक्कादायक.. अर्थमंत्र्यांच्या चंद्रपुरात 108 रुग्णवाहिकेतून अवैध दारूची तस्करी

हैदर शेख,(प्रतिनिधी)

चंद्रपूर, 18 ऑगस्ट- आरोग्यदृष्ट्या संकटात सापडलेल्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात सुरू केलेल्या 108 या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अवैध दारु तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरात उजेडात आली आहे. शहरातील रामनगर पोलिसांनी बाबुपेठ भागातून 108 रुग्णवाहिकेतून सहा लाख रुपयांची दारू जप्त केली आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गेली चार वर्षे दारूबंदी लागू करण्यात आली आहे. या दारूबंदीनंतर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची दारू अवैधरित्या पोहचत असून या प्रकरणात आजवर हजारो आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दारुबंदीविरोधातील कारवाई सातत्याने सुरू असताना शहरातील बाबुपेठ भागातून गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने 108 रुग्णवाहिकेत दडवलेली सहा लाख रुपये किमतीची दारू जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शहर पोलिसांनी यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या राहुल वानखेडे नामक चालकाला या प्रकरणी अटक केली असून एकूण 16 लाख 85 हजाराचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त करण्यात आला आहे. एरवी शहरासह जिल्ह्याच्या रस्त्यांवरून रुग्ण वाहून नेत असलेल्या या रुग्णवाहिकांच्याबाबतीत सामान्य नागरिकांच्या मनात अत्यंत करुणेची भावना असते. मात्र, याच रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अशाप्रकारे दारु तस्करी होण्याची पहिलीच घटना उजेडात आली असून यापुढील काळात या रुग्णवाहिकेसह सर्वच रुग्णवाहिकांची अवैध दारु तस्करी संदर्भात तपासणी गरजेची झाली आहे.

या प्रकरणातील 2 आरोपी सध्या फरार असून या वाहनांचे केंद्रीकृत संचालन होत असताना रुग्ण वाहनात नसताना हे वाहन चंद्रपुरात पोचले कसे? असा सवाल उपस्थित झाला आहे. चंद्रपुर-गडचिरोली-वर्धा हे 3 लगतचे जिल्हे दारुबंदी असलेले जिल्हे आहेत. सध्या या जिल्ह्यात यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमधून दारू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, जनसामान्यांना विश्वासाची असणारी 108 रुग्णवाहिकासेवा दारू तस्करीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडणे, सेवेवर दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे.

Loading...

VIDEO: '...तर मी लोकांना सांगेन कायदा हातात घ्या आणि धुलाई करा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...