खेड (रत्नागिरी), 16 डिसेंबर: महिलांच्या सुरक्षिततेबाबत 'शक्ती कायदा' आणणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, अत्याचार पीडित महिलांची पोलीसच तक्रार घेत नसतील तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न एका घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. अत्याचार पीडितेची तक्रार न घेता उलट तिच्यासह तिच्या आईल पोलिसांनी धमकावल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे खेड पोलीस स्टेशनमधील एका हवालदारानं फोनद्वारे रात्री अपरात्री पीडिता आणि तिच्या आईला अश्लिल मेसेज केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा...उदयनराजे भोसले यांच्या एका दगडात दोन शिकार, 'या' मंत्र्यांवर केली जहरी टीका
आता या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी घेतली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. मात्र दुसरीकडे संबंधित पोलीस हवालदाराकडून पीडित कुटुंबीयांना धमकावलं जात असल्याची माहिती समोर आली आहे.
'पोलीस अधीक्षक साहेबांना माझ्याबद्दल काहीही सांगू नको,' अशा शब्दांत संबंधित हवालदार आणि त्याच्या मित्राकडून दूरध्वनीवरून दबाव आणला जात असल्याचं पीडित तरुणीनं सांगितलं आहे. पीडित तरुणी तिच्या आईसोबत खेड शहरात भाड्याच्या घरात राहतात. धक्कादायक म्हणजे धमकावणारा हवालदार तर घर मालकिणीपर्यंत पोहोचला आहे. त्यांना पीडित कुटुंबाविषयी उलटसूलट माहिती देत आहे.
हेल्प फाउंडेशन मदतीला सरसावलं...
दरम्यान, पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी चिपळून येथील हेल्प फाउंडेशननं पुढाकार घेतला आहे. हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून आता या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरु केला आहे.
हेही वाचा...निर्भया प्रकरणात फाशी दिलेल्या चारही गुन्हेगाराचं कुटुंब भोगत आहेत 'जन्मठेप'
काय आहे प्रकरण?
खेड शहरातील एका ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे फेसबुकवरून एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. तरुणानं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुण आणि त्याच्या नातेवाईकांनी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितेसह तिच्या आईनं खेड पोलीस स्टेशन गाठलं. मात्र, मायलेकींची तक्रार न घेता त्यांना पोलीस अधिकाऱ्याकडूनच धमकवण्यात आलं. तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. एवढंच नाही तर खेड पोलीस स्टेशनमधील एका हवालदारानं या पीडित तरुणीला रात्री अपरात्री फोन करून अश्लील संभाषण, मेसेज आणि व्हिडिओ कॉल केले. मात्र आता या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी घेतली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.