कल्याण, 14 नोव्हेंबर: डम्पिंगवर कचरा कमी येत असल्याने कचरा वेचक लोकांनी सकाळपासून कचऱ्याच्या गाड्या अडवून धरल्याचे दिसून आले. डम्पिंगवर येणारा कचरा कमी झाल्याने आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न विचारत या कचरा वेचक लोकांनी सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून हे आंदोलन केलं. त्यामुळे वाडेघर डम्पिंग ग्राऊंड ते दुर्गाडी चौक परिसरात कचऱ्याच्या गाड्यांची मोठी रांग लागली होती.
वाडेघर डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या दृष्टीने एप्रिल महिन्यापासून केडीएमसीने ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे नागरिकांना बंधनकारक केले आहे. या उपक्रमाला कल्याण-डोंबिवलीकर चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा...सरकारी अधिकाऱ्यांच्या ड्रेसकोडवरुन 'या' भाजप नेत्यानं आदित्य ठाकरेंना घेरलं...
वाडेघर डम्पिंगवर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण नेहमीपेक्षा बरेच कमी झाले आहे. मात्र, याचा फटका गेल्या कित्येक वर्षांपासून डम्पिंगवरील कचऱ्यातून उदरनिर्वाह करणाऱ्या कचरा वेचक कुटुंबांना बसत आहे. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण होऊन इकडे कचरा येत असून त्याद्वारे इथल्या कचरा वेचकांना पूर्वीपेक्षा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न मिळत आहे.
कचरा नव्हे आता पेटली पोटातील आग! कल्याणमध्ये कचरा वेचकांनीच अडवल्या गाड्या.... pic.twitter.com/PkbA7wORel
— News18Lokmat (@News18lokmat) December 14, 2020
याविरोधात सोमवारी सकाळी साधारणपणे 7 वाजल्यापासून या कचरा वेचकांनी डम्पिंगवर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून धरल्या. कचरा वर्गीकरण केला जात असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून कचरा महापालिकेने वर्गीकरणाचे आम्हाला काम देण्याची या लोकांची मागणी आहे.
दरम्यान हे आंदोलन मागे घेण्याबाबत महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या आंदोलकांना विनंती केली. अखेर केडीएमसी आयुक्तांनी भेटीची वेळ दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
हेह वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांचा बंगलाही डिफॉल्टरच्या यादीत
दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली मनपा (केडीएमसी) क्षेत्र कचरामुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकप्रतिनिधी देखील शहर स्वच्छ करण्यासाठी झपाटून कामाला लागले आहेत. तसेच आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचं सगळ्याकडून स्वागत करण्यात येत आहे. सध्या नगरपालिकेत 113 घंटागाडी, 10 डंपर, 43 आरसी वाहन कार्यरत आहेत. प्रत्येक वार्डात फिरून ओला आणि सुका कचरा संकलण करण्यात येत आहे.