सावधान...शौचालयाच्या पाण्यावर पिकवल्या जातात इथे भाज्या

सावधान...शौचालयाच्या पाण्यावर पिकवल्या जातात इथे भाज्या

ही दुषीत भाजी पुणे आणि नाशिकच्या वाहनांद्वारे मुंबईत आणली जाते. त्यामुळे ही भाज इथे पिकवली नाही असा समज निर्माण होतो.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 8 जून : पौष्टिक आहार घ्या, ताज्या पालेभाज्या खा असे डॉक्टर्स कायम सांगत असतात. भाज्या खाल्ल्याने आपल्याला विविध प्रकारची खनिजे व इतर पोषक तत्वे या भाज्यांमधून मिळतात. परंतु हीच भाजी जर विषारी असेल तर काय होईल याची कल्पना केलेलीच बरी. ठाण्याजवळच्या कळवा इथं शौचालयाच्या सांडपाण्यावर भाज्या पिकवल्या जात असल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

गेली दोन वर्षे कळवा रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या जमिनीवर विविध पालेभाज्यांची शेती होत असल्याचं उघड झालंय. ही भाजी  पुणे आणि नाशिकच्या वाहनांद्वारे मुंबईत आणली जाते. पुणे नाशिकच्या गाड्यांमधून या भाज्या  आणल्यामुळे ही तिथेच पिकवलेली आहे असा समज नागरिकांमध्ये व्हावा असा हेतू या भाजी माफियांचा आहे.

इथे असलेल्या शौचालयातून जे सांडपाणी निघते त्याच पाण्याचा वापर करून ही शेती केली जाते.या भाज्या पिकवण्यासाठी हेच दूषित पाणी वापरलं जातं, कारण दुसरं पाणीच उपलब्ध नसल्याचं ही शेती करणाऱ्या महिनांनी मान्यही केलंय.

कळवा रेल्वे स्थानकाशेजारी जी शौचालय आहेत त्यातून हे सांडपाणी बाहेर निघतं. या पाण्याच्या वापरातून ज्या भाज्या निघतात त्यात अतिशय घातक असे घटक असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. त्यामुळे  नागरिकांना  पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासन,अन्न आणि औषध प्रशासन आणि महापालिका प्रशासन याकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येतोय.

मुंबई असलेल्या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा असलेल्या 450 एकर खुल्या जागेवरही अशाच प्रकारे भाजी तयार होत असून ती अत्यंत कमी भावात विकत घेऊन दसपट नफ्यात नागरिकांना विकण्यात येते अशी माहिती स्थानिक रहिवासी राकेश पेडणेकर यांनी दिली. आपल्याच कर्मचाऱ्यांना ही जमीन कसण्यासाठी देण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासन देत असली तरी या जमिनीवर काम करणारे परप्रांतीय असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांनी केलाय.

या शेती माफीयांवर कडक कारवाई करून ही जागा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना फुलशेती साठी द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

First published: June 8, 2019, 6:39 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading