वेदांतची 16 दिवसांची झुंज अपयशी, कुत्र्याने चावा घेतल्यामुळे मृत्यू

वेदांतची 16 दिवसांची झुंज अपयशी, कुत्र्याने चावा घेतल्यामुळे मृत्यू

वेदांत घराच्या ओट्यावर आजी सुमनबाई यांच्या सोबत बसला होता. त्याचवेळी अचानक एक पिसाळलेल्या कुत्र्याने वेदांत याच्यावर हल्ला चढवला.

  • Share this:

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी

भुसावळ, 07 मार्च : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ  शहरातील एका साडेतीन वर्षांच्या मुलाचा कुत्र्याने चावल्यामुळे मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.  वेदांत मालखेडे असं या मुलाचं नाव आहे.  २१ फेब्रुवारी रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने वेदांतच्या चेहऱ्यावर चावा घेतला होता. तब्बल १६ दिवस जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इतर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, आज वेदांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहरातील जळगाव रोडवरील जुना सतारा भागातील रहिवासी असलेले अनिल मालखेडे यांना एक मुलगा वेदांत आणि एक मुलगी वैष्णवी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी (दि. २१ फेब्रुवारी) सकाळी वेदांत घराच्या ओट्यावर आजी सुमनबाई यांच्या सोबत बसला होता. त्याचवेळी अचानक एक पिसाळलेल्या कुत्र्याने वेदांत याच्यावर हल्ला चढवला. या कुत्र्याने वेदांतच्या चेहऱ्याला भीषण चावा घेतला होता. अचानक झालेल्या या प्रकाराने लहानगा वेदांत आणि आजी भांबावून गेले. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली.

वेदांत याला तात्काळ पालिकेच्या दवाखान्यात नेण्यात आलं. तिथं चेहऱ्यावरील जखमांवर इलाज करून त्यास रॅबिज आणि टीटीचे इग्जेक्शन दिलं. वेदांत याच्या गालावर सात जखमा झाल्या होत्या. गालावरील जखमा खोलवर असल्याने वेदांतला मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता, असं त्याचे वडील अनिल मालखेडे यांनी सागितलं.

मुलावर पालिका दवाखान्यात उपचार करून त्यांनी जळगाव येथील जिल्हा मेडीकल कॉलेज व जिल्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाळाला जळगाव इथं दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्या गालावर इंजेक्शन दिले. तेथून परत वेदांतला भुसावळ इथं आणले आणि पालिकेच्या दवाखान्यात २४, २८ फेब्रुवारी आणि तीन मार्चला असे रॅबिजचे इंजेक्शन दिले.

मुलांची प्रकृती पाहिजे तशी ठीक होत नसल्याने त्यास शहरातील खासगी दवाखान्यात नेले. मात्र, त्या दवाखान्यात वेदांतला न तपासताच त्याला जळगाव इथं एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. तेथील डॉक्टरांनी सुद्धा न पहाता तेथिल असिस्टन डॉक्टरांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.

वेदांतवर जिल्हा रूग्णालयात उपचार होत असतांना आमच्याकडे ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर नसल्यानं आपण बाळाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. बाळाला बरे वाटेल म्हणून वेदांतच्या वडिलांनी त्याला डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. परंतु, आज वेदांतचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. वेदांतवर 16 दिवस उपचार झाला पण आज या चिमुरड्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला. साडेतीन वर्षांच्या चिमुरड्या वेदांतच्या मृत्यूमुळे मालखेडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

First published: March 7, 2020, 7:35 PM IST

ताज्या बातम्या