पुणे, 30 नोव्हेंबर : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १५ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वर्षभरापूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते.
डॉक्टर नानगाथ कोत्तापल्ले यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा यांसह विविध प्रकारात त्यांनी साहित्य निर्मिती केली होती. तसंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरुही होते.
हेही वाचा : मुंबईद्रोह तर केलाच आता महाराष्ट्रद्रोह...; भाजपाचा आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी २९ मार्च १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला. देगलुर इथं महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी घेतलं. बीए आणि एमए परीक्षेत त्यांनी मराठवाडा विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला होता. तसंच कुलपतींच्या सुवर्णपदकाने त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९८० मध्ये त्यांनी शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर शोधप्रबंध लिहून पीएचडी संपादन केली होती. त्यांनी बीडमधील महाविद्यालयात १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणूनही काही काळ काम केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news, Pune news