सिंधुदुर्ग, 23 मार्च : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वैभव नाईक हे एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेत प्रवेश करतील, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. वैभव नाईक यांच्याकडून सिंधुदुर्गचं शिवसेना जिल्हाप्रमुखपद काढून घेतल्यानंतर या चर्चांनी आणखी जोर धरला. वैभव नाईकांनी मात्र या चर्चांचं खंडन केलं आहे. जिल्ह्याबाहेर आपण करू लागल्यामुळे आपली जिल्हाध्यक्ष पदावरून मुक्तता करण्यात आल्याचं स्पष्टीकरण वैभव नाईक यांनी दिलं.
वैभव नाईक यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही कोकणातले खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या पोस्टर्समधून वैभव नाईकांचे फोटो गायब होते. यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी वैभव नाईकांचा शिवसेना प्रवेश का लांबणीवर पडला, याबाबत गौप्यस्फोट केला आहे.
'वैभव नाईक शिवेसनेत जाण्यास इच्छुक आहे, पण शिवसेनेत गेल्यावर मालवण कुडाळ मतदारसंघातून उमेदवारीची हमी न मिळाल्याने वैभव नाईकांचा शिवसेना प्रवेश लांबणीवर पडला आहे,' असा दावा निलेश राणे यांनी केला आहे.
मालवण-कुडाळ मतदारसंघावर राणे कुटुंबाचा दावा आहे, त्यामुळे राणेंच्या भूमिकेवरच वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश अवलंबून असल्याचंही राणेंनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंना वैभव नाईक चोरून भेटले नाहीत, हे नाकारणाऱ्या वैभव नाईक यांनी कोणत्याही देवाला हात लावून सांगावं, असं आव्हानही निलेश राणे यांनी दिलं आहे.
'वैभव नाईक शिवसेनेत जाणार होते, कुडाळ-मालवण मतदारसंघात राणे लढणार नाहीत, हे आधी कनर्फम होऊ द्या आणि राणेंना तिकीट देणार नाही, हे फायनल झाल्यानंतर तसंच कुडाळ-मालवण मधलं तिकीट फायनल झालं तरच आपण शिवसेनेत येऊ, असं वक्तव्य वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदेंना भेटून केलं. जर वैभव नाईक हे खोटं आहे, असं म्हणत असतील, तर त्यांनी कोणत्याही मंदिरात जाऊन देवाच्या पाषाणाला हात लावून आपण असं बोललोच नव्हतो, असं सांगावं,' असं निलेश राणे म्हणाले आहेत.
'वैभव नाईक खोटारडे असून ते शिवसेनेत फक्त मलई खात आले आहेत आणि उद्धव ठाकरेंची दिशाभूल करत आले आहेत, त्यामुळे चोरून लपून एकनाथ शिंदेंना भेटणाऱ्या वैभव नाईकांनी निष्ठेची भाषा करू नये,' अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray