बीड, 1 डिसेंबर : देश आणि जगावर कोरोना (Corona) संकट असताना आता ओमायक्रोन (Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणूने धाकधूक वाढवली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या या नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. देशात सध्या ओमायक्रोनचा अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. पण हे नवं संकट जर देशावर आलं तर त्याला थोपविण्यासाठी लसीकरण (Vaccination) हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे सरकारकडूनही लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. विशेष म्हणजे बीडमध्ये (Beed) तर एका माजी आमदाराच्या मुलाच्या लग्नात लसीकरणाची एक अनोखीच मोहिम राबविली गेल्याचं चित्र बघायला मिळालं आहे.
लसीकरणाचे प्रबोधन व्हावे यासाठी वेगवेगळ्या शक्कल प्रशासन लढवत असल्याचे आपण पाहिले असेल. मात्र बीडमध्ये एका लग्न सोहळ्यात चक्क लस असेल तरच विवाह मंडपात प्रवेश दिला जात होता. लस नसेल तर लगेच लस टोचून घेतली जात होती. यामुळे या विवाह सोहळ्याची भन्नाट चर्चा सुरु आहे. बीडचे माजी आमदार सुनील धांडे यांचे सुपुत्र आणि आणि माजी सभापती नारायण परझने यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात संयोजकांनी लसीची सक्ती केली. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने ॲम्बुलन्समध्ये लसीकरण केले जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या हस्ते या लग्न मंडपातील लसीकरणाचा शुभारंभ झाला.
हेही वाचा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अवमान? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
लसीकरनासाठी नागरिक पुढे येत नाहीत म्हणून लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आम्ही हा उपक्रम घेत आहोत, असं मुलीचे वडील नारायण परझने यांनी सांगितले. ज्यांनी लस घेतली नाही अशा सर्व वऱ्हाडी मंडळींनी लस घ्यावी, असे आवाहन संयोजक मंडळींच्या वतीने केशव तांदळे यांनी केली.
लग्न समारंभामध्ये लसीकरणाची जनजागृती व्हावी यासाठी नारायण पर्जन्य आणि सुनील धांडे यांनी घेतलेल्या या उपक्रमामुळे लसीकरणाचे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील लोकांना देखील महत्त्व करण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन लस घ्यावी, असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .सुरेश साबळे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.