पुढच्या महिन्यात करू शकाल तुमचे हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

पुढच्या महिन्यात करू शकाल तुमचे हॉटेलिंग आणि डिनर प्लॅन्स; मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

Unlock Maharashtra 5 : गेले अनेक महिने वाट पाहायला लावणारे डिनर प्लॅन्स आणि हॉटेलिंगचे बेत लवकरच पूर्ण होऊ शकतील. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेस्टराँ आणि बार उघडण्याचं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : राज्यातली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करायला परवानगी देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेस्टॉरंटचालकांना दिलं आहे. Coronavirus ची साथ झाल्यापासून हॉटेल उद्योग बंद आहे. कोविड काळात सर्वाधिक नुकसान झालेलं हे क्षेत्र आहे. त्यामुळे आता Unlock Maharashtra च्या पुढच्या टप्प्यात तरी हॉटेल उघडायला परवानगी द्या, अशी मागणी घेऊन हॉटेल व्यावसायिक मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन बैठकीत भेटले. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबरमध्ये रेस्टराँ आणि बार उघडण्यास परवानगी दिली जाईल, असं सांगितलं आहे.

पुणे, मुंबई आणि मोठ्या शहरांतल्या हॉटेल व्यावसायिकांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक केली. व्यवसायाचं नुकसान थांबवण्याची विनंती केली आणि मुख्यमंत्री ठाकरेंनी आम्हाला आश्वासन दिल्याचं पुणे रेस्टराँ अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितलं.

कोरोना काळात हॉटेल उघडण्यासाठी काय नियम असतील, काय अटी पाळाव्या लागतील याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून लवकरच हॉटेल व्यावसायिकांना दिली जाईल आणि त्या पाळण्याची आमची तयारी असल्याचं शेट्टी म्हणाले. 2020-21 मध्ये जेवढे दिवस हॉटेल व्यवसाय बंद होता ते पाहून प्रो रेटा बेसिसवर उत्पादन शुल्क (Excise fee) आकारावी, अशीही विनंती हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. त्याबद्दलही ठाकरे यांनी आश्वासन दिल्याचं शेट्टी म्हणाले.

महाराष्ट्रात Coronavirus चे सर्वाधिक रुग्ण आहेत. रुग्णसंख्या आणि मृत्यूदरही देशात जास्त आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये Covid-19 चे सर्वाधिक रुग्ण असून अजूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे Unlock 5  मध्ये जिम, स्विमिंग पूल आणि रेस्टॉरंट्सना परवानगी मिळणार का हे अद्याप स्पष्ट नव्हतं. पण हॉटेल व्यावसायिकांच्या जोरदार मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून हॉटेल्सना मुभा देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

जीवनशैलीत बदल करणे आवश्यक

आता सण उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी होत आहे.. लोकांचा संयम हा देखील महत्वाचा विषय आहे. पण कोरोना सोबत जगतांना आता आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे.  म्हणजे काय तर मास्क लावणे, हात धुणे,  शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरन्ट्स सुरु करतांना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करा

या विषाणूने बाधित 80 टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणुचा प्रसार होऊ शकतो जी बाब गंभीर आहे हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, SoP पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरन्ट्ससाठीची रेसीपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचेही सांगतांना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन यात सहभागी होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 28, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या