विजय कमळे पाटील, (प्रतिनिधी)
जालना, 21 जून- जालन्याच्या जलयोगीने चक्क शेततळ्यात योगा करून अनोख्या पद्धतीने योगदिन साजरा करीत सर्वांचच लक्ष वेधून घेतलंय. आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी देखील योगा करून योग दिन साजरा केला. मात्र, जालन्यातील एका योगप्रेमीने चक्क शेततळ्याच्या पाण्यात योगाची प्रात्यक्षिके दाखवून अनोख्या पध्दतीने योगदिन साजरा केलाय.
निवृत्ती गडलिंग असं या अवलिया जलयोगीचं नाव असून तो जालना तालुक्यातील मोतीगव्हान या गावाचं रहिवाशी होय. अल्पशिक्षित असलेला बेचाळीस वर्षीय निवृत्ती हा गवंडी काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतो. मागील सहा वर्षांपासून तो अश्याप्रकारे पाण्यावर योगा करतो. त्याच्या योगा करण्याची पध्दत जितकी हटके आहे त्यामागचं इतिहास पण तेवढंच हटके आणि रोचक असल्याचं निवृत्ती स्वतः सांगतात.
ग्रामीण भागात राहत असल्याने पोहण्यासाठी स्विमिंग पूल नाही आणि दुष्काळी परिस्थिती व पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे नद्या आणि तलावात देखील पाण्याचं ठणठणाट. म्हणून निवृतती याने गावातील शेततळ्यांचा आधार घेतलाय. गावातील शेततळ्यांवर जाऊन निवृत्ती तासंतास जलयोग साधना करतात. एवढंच नव्हे तर पैठणच्या नाथसगर धरणाच्या पाण्यात देखील निवृत्तीने आपल्या या अनोख्या जलयोग साधनेचे प्रात्यक्षिके दाखऊन उपस्थितांना अचंबित केलं. निवृत्ती यांच्या या आगळ्यावेगळ्या योगसाधनेमुळे गावातील इतर मंडळी देखील योगाकडे आकर्षित होऊ लागलीय. आज घडीला गावातील अनेक महिला आणि पुरुष मंडळी एकत्रित येत दररोज पहाटे न चुकता किमान तासभर तरी योगा करतात. योगामुळे लोकांना खूप लाभ होत असून अनेकांचे असाध्य रोग देखील बरे झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणताय.
VIDEO: योग फिव्हर! डॉग स्क्वॉडने केलेल्या ह्या कवायती तुम्ही पाहिल्या का?