अमरावती, 18 जुलै- लग्न कुणी कुठे करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. जगात अनेक जण सर्वोच्च शिखरावर, कुणी विमानात तर कुणी महासागराच्या तळात जाऊन लग्नाच्या रेशीमगाठी बांधतात. मात्र, अमरावतीत यापेक्षाही एक अनोखा विवाह सोहळा शुक्रवारी रंगणार आहे. चक्क उपोषणाच्या मंडपात वीज कर्मचारी विवाहबंधनात अडकणार आहे. उपोषणकर्ते अन्य वीज कर्मचारी या विवाहातील वऱ्हाडी असतील.
महावितरण प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करीत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्त्वात 9 जुलैपासून अमरावती येथील महावितरण कार्यालयासमोर सात कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू आहे. या उपोषणामध्ये निखिल अरुण तिखे हा वीज कर्मचारी सुद्धा सहभागी झाला आहे. त्याचा विवाहाचा मुहूर्त 19 जुलै (शुक्रवारी) आहे. मात्र उपोषण लांबल्यामुळे त्याला घरी जाता येणार नाही. त्यामुळे उपोषण मंडपातच लग्नाचा सोपस्कार पार पडण्याचा निर्णय निखिलसह त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. गुरुवारी सनई चौघड्यात उपोषण मंडपातच निखिलला हळद लागली.
काय म्हणाला निखिल?
'मी मागील कित्येक दिवसांपासून सांगत आहे, माझं लग्न आहे. मी बदलीस पात्र असूनही अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्पर बदली केली नाही. आता लग्नाचा कार्यक्रम सुद्धा उद्या इथेच होणार असल्याचे नवरदेव निखिल तिखे यांनी सांगितले आहे.
मागील 9 दिवसांपासून 7 जण उपोषणाला बसले आहे. उद्या निखिलचं लग्न आहे. तरी देखील प्रशासनाला अजूनही जाग आली नाही. साहेबांच्या पोराचं लग्न जर असतं तर त्यांनी असंच केलं असत का, असा सवाल निखिलच्या मामाने प्रशासनाला केला आहे .
कतरिनाच्या फोटोची अर्जुन कपूरने उडवली खिल्ली, मनोरंजन विश्वातील टॉप घडामोडी