बीड. 2 मे- कडाक्याचे उन्हात ढोल ताशाच्या तालात नाचणारी वऱ्हाडी मंडळी..नटून थटून मानपानासाठी नाक मुरडनाऱ्या कलवऱ्या, थाट भाट असे लग्न अनेकदा पाहिली असतील पण..पण आज वेगळं लग्न दाखवणार आहे.. या लग्नात बँड वाजत होता. कलवऱ्याही नटल्या होत्या. पण इथे कोणी वऱ्हाडी नाचत नव्हते तर इथे प्रत्येकाच्या हातात टिकाव, खोरे, पाटी होती. कदाचित लग्नात मानपान याऐवजी हें पहिलं तर लोक म्हणतील यांना वेड लागलं की काय..पण होय यांना वेडच लागलं तेही दुष्काळ मुक्तीचं..
सांगलीत लोकांच्या जिवाशी खेळ, पाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर
लग्न आनंदात थाटामाटात व्हावं, हे प्रत्येकचं स्वप्न असतं. लग्न म्हणजे जीवनातील सर्वोच्च आनंदचा क्षण असतो. यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. पण, गावातील पाणी संकट कायमचे घालवायचं, यासाठी चंग बांधलेल्या ज्ञानेश्वर या 28 वर्षीय तरुणाने लग्नाच्या खर्चाला फाटा देत. या पैशाची दुष्काळ मुक्तीच्या यज्ञात आहुती देत आगळावेगळा विवाह पार पडला.
'या वयात पाण्यासाठी 2-3 किलोमिटर चालावं लागतंय, लेकरांना कसं मोठं करायचं?'
बीड तालुक्यातील बाभूळखुंटा गाव पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहे. दुष्काळ मुक्तीसाठी अख्ख गाव परिश्रम घेत आहे. याच गावातील ज्ञानेश्वर साक्रुड हा तरुण गेल्या दोन महिन्यांपासून पाणी फाऊंडेशनचा 'जलदुत' म्हणून गावात जनजागृती करत आहे. या चळवळीत लोकांना प्रोत्साहित करत आहे. त्याचं लग्न जमलं मुलगी गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला या गावातील सरस्वती संदीप बोर या तरुणीसोबत. मुलीकडे लग्न व्हावं ही सरस्वतीच्या वडिलांची इच्छा होती. पण दोन्हीकडे खर्च होईल. यापेक्षा खर्चाला फाटा देत. सगळं गाव तर श्रमदान करण्यासाठी शिवारात येते. मग शिवारातच लग्न करु, अशी कल्पना ज्ञानेश्वरने बोलून दाखवली. मुलीकडील लोकांनी होकर दिला. आणि हा आगळावेगळा लग्न सोहळा संपन्न झाला.
याबद्दल चित्रलेखा येवले (गावातील महिला) म्हणाल्या,'बाभूळखुटा गावात वऱ्हाडी मंडळीचा टेम्पो आला. मंदिरजवळ विचारलं लग्न कुठे तर बोट शेताकडे दाखवलं. ते वऱ्हाडी मंडळी शेतात आले. त्यांच्या स्वागतासाठी गावातील सर्व लोक उपस्थिती होते. पण हारतुरे घेवून नाही तर खोरे, टिकाव, पाटी घेवून.. सुरुवातील नटून थटून आलेल्या व्याही मंडळीला आश्चर्यचा धक्का बसला. पण, खुद्द नवरदेव श्रमदान करतोय म्हटल्यावर एका पाठोपाठ सगळे कामाला लागले. नवरा मुलगा टिकाव घेवून खोदत होता तर नवी नवरी शालू सावरत माती भरून बाहेर टाकत होती. अर्धातास श्रमदान करुन मग सगळं वऱ्हाड छोट्या मंडपात बसलं तर कोणी झाडाखाली विसावलं..लगेच अक्षता वाटण्यात आल्या..सुरु झालं शुभमंगल सावधान...! लग्न सोहळा पार पडल्यानंतर पाहुने मंडळीला आहेर म्हणून एक वृक्ष भेट देण्यात आले तर भेट म्हणून मिळालेले सगळे पैसे पाणी फाउंडेशनला लागणाऱ्या डिझेलसाठी देण्यात आले.'
दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट
या अनोख्या विवाह सोहळ्याबद्दल नवरा मुलगा ज्ञानेश्वर साक्रुड म्हणला, विवाह हा आनंदचा क्षण आहे. पण गावाचं गेलेलं वैभव मिळवून देण्यासाठी मला आज दुष्काळ मुक्तीचा लढा महत्त्वाचा आहे. दुष्काळ मुक्तीसाठी लग्नाअगोदर नवरा-नवरीचे श्रमदान..नंतर व्याही मंडळी सगळयांना दुष्काळ मुक्तीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, हा खूप मोठा संदेश मिळाला.
आजचा हा अनोखा लग्न सोहळा पाहून आनंद झाला. या बाबतीतसगळ्यांनी सहकार्य केलं खर्चाला फाटा देवून हा आदर्श संदेश देणारा सोहळा झाला, असे गौरवोद्गगार डॉ.सुधीर येवले (मार्गदर्शक पानी फाऊंडेशन) यांनी काढले.
बीड जिल्ह्यातील 400 गावात अशाच पध्दतीने लोक लगीन घाई करत दुष्काळ मुक्तीच्या लढ्यात सहभागी झाले आहेत. पााणी फाउंडेशनच्या सहकार्य आणी मार्गदर्शनाने गावागावातील वऱ्हाड हे जलसंधारणाला निघाल्याचे चित्र दिसत आहे.
SPECIAL REPORT : बाटली बंद पाणी घेताय, तर सावधान!