सोलापूर, 18 जुलै- सांगोला (ता. सोलापूर) येथील स्मशानभूमीत शुक्रवारी (19 जुलै) सकाळी 10 वाजून 45 मिनिटांच्या मुहूर्तावर मंगलाष्टकं गुंजणार आहेत. मसनजोगी लक्ष्मण राजाराम घनसरवाड यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडणार आहे. कारण, बीडचे रहिवासी असलेले गेल्या अडीच वर्षांपासून (2017) लक्ष्मण घनसरवाड यांचे कुटुंबीय स्मशानभूमीत वास्तव्यास आहेत.
लक्ष्मण घनसरवाड यांची मोठी कन्या पूजा हिचा विवाह नांदेड जिल्ह्यातील मनाठा येथील सुभाष गोविंद सागवाने यांचे चिरंजिव संतोष याच्याशी होत आहे. पूजा हिने डी. फार्मसीचे तर संतोषने बी. फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे. बीडमध्ये 13 मे रोजी साखरपुडा झाला होता. मात्र, विवाह सोहळ्याची तारीख निश्चित झाली नव्हती. लक्ष्मण घनसरवाड व सुभाष सागवाने यांनी 10 दिवसांपूर्वी विवाह सोहळ्याचे नियोजन केले. 19 जुलैला विवाहाचा मुहूर्त काढण्यात आला आणि स्मशानभूमी हे विवाहस्थळ निश्चित करण्यात आले. ठरल्याप्रमाणे या विवाहात होणारा खर्च वधू-वर पक्षाच्या पित्याकडून निम्मा-निम्मा करण्यात येणार आहे.
वऱ्हाडींसाठी असा जेवणाचा मेनू..
वाढेगाव रोडवर असलेल्या स्मशानभूमीतच 30 बाय 40 चा मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडींसाठी शिरा, भात, भाजी, चपाती असा जेवणाचा मेनू ठेवण्यात आला आहे. विवाह सोहळ्यात वधू पक्षाकडून रितीरिवाजाप्रमाणे वर पक्षाच्या पाहुण्यांचा मानपान होणार आहे. शुक्रवारी सकाळी पूजाला हळद लागणार आहे. तिच्या हातावर संतोषच्या नावाची मेहंदी सजली आहे.
स्मशानभूमीतच चालतो घनसरवाड कुटुंबाचा चरित्रार्थ..
बीडचे रहिवासी लक्ष्मण राजाराम घनसरवाड हे आपल्या कुटुंबसह 2017 मध्ये सांगोल्यात आले होते. नगरपालिकेने लक्ष्मण घनसरवाड यांची मसनजोगी म्हणून नियुक्त केले आहे. लक्ष्मण घनसरवाड हे मसनजोगीचे काम करत असून घनसरवाड कुटुंबाचा चरित्रार्थ स्मशानभूमीतच चालतो. लक्ष्मण घनसरवाड यांचा मुलगा सुदर्शन 12 वीत तर हर्षदीप 7 वीत आहे. अनुराधा बी.एस्सीचे व जयश्री 10 वीचे शिक्षण घेत आहे.
SPECIAL REPORT : मिशा कापल्या म्हणून पोलिसात तक्रार, असं नेमकं काय घडलं?