मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''2024 ला राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार'', नाना पटोलेंच्या वक्तव्यावर दानवेंचं प्रत्युत्तर

''2024 ला राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार'', नाना पटोलेंच्या वक्तव्यावर दानवेंचं प्रत्युत्तर

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress state president Nana Patole) नाना पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 14 फेब्रुवारी: केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress state president Nana Patole) नाना पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठीवरुन भाष्य केलं होतं. त्यावर दानवेंनी पटोलेंना जशाच्या तसं उत्तर दिलं आहे. नाना यांना पक्ष सोडण्याचा चांगला अनुभव आहे. म्हणून ते तसे बोलतात. पण भाजपचे ज्यावेळी देशात 2 आमदार होते तेव्हाही कार्यकर्ते आमच्या सोबत होते आणि आता ही आहेत, असं दानवेंनी म्हटलं आहे.

''नाना पटोलेंना पक्ष सोडण्याचा चांगला अनुभव'', रावसाहेब दानवेंचा टोला

नाना यांना पक्षातून बाहेर पडण्याचा अनुभव चांगला आहे. त्यामुळे कदाचित ते असे बोलले असतील. पण नाना माझे चांगले मित्र आहेत. त्यांना हेही माहित आहे की, एकेकाळी या देशात भाजपचे दोन आमदार निवडून आले होते. तेव्हाही कार्यकर्ते आमच्या सोबत होते आणि आता ही आहेत. आता भाजपचे 303 खासदार आहेत, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पळकुटे नाही आहेत. ते हिंमतीनं, ताकदीनं दम धरुन या सरकारच्या विरुद्ध संघर्ष करत आहेत. पुढच्या काळात तुम्हाला दिसेल या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर 2024 ला भाजपची या राज्यात पुन्हा सत्ता येईल, असं ठाम विश्वासही रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला आहे.

पटोलेंची चंद्रकांत पाटलांच्या भविष्यवाणीवर प्रतिक्रिया

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकार पडणार असल्याचं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण त्यांच्या या भविष्यवाणीवरुन नाना पटोले यांनी टीका केली. "भाजपला सत्तेचा मानसिक रोग झाला आहे. पहाटेचं सरकार झालं तेव्हापासून भाजपचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. सतत असे वक्तव्य करुन राज्याची जनतेची दिशाभूल करत आहेत", असा घणाघात नाना पटोलेंनी केला.

"आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी. कारण ते देशाच्या आईवर बोलले आहेत. आम्ही हिंसेने उत्तर देणार नाही. मात्र त्यांना जनता माफ करणार नाही. पंतप्रधान संसदेत कसे भाषण करतात, त्यांना जनता कधीही माफी करणार नाही. लोकांना तोडण्याचे काम भाजप नेहमी करत आहे. जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजप समाजात फूट पाडते, तरीही सगळ्या निवडणूक भाजपा हरत आहेत", असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

'देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणार'

"पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपतींचा अपमान करत होते. तेव्हा भाजपचे सदस्य बाक वाजवत होते. याचा निषेध म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार", असं नाना पटोलेंनी यावेळी सांगितले. तसेच "देशाच्या सीमा बंद करा, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया यांनी केली. मात्र नियम बाजूला सारुन नमस्ते ट्रम्प सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सभा घेत पंतप्रधानांनी कोरोना पसरवला", अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

First published:

Tags: BJP, Nana Patole, काँग्रेस