उस्मानाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; बेडअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचार

उस्मानाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; बेडअभावी रुग्णांवर जमिनीवर उपचार

उस्मानाबादेतही रुग्णसंख्या वाढल्याने बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांवर जमिनीवर उपचार करावे लागत आहेत. त्याचवेळी नागरिक नियम पायदळी तुडवत असल्याचंही पाहायला मिळतंय.

  • Share this:

उस्मानाबाद, 13 एप्रिल : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यभर सगळीकडेच कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढलेली दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्येच कोरोनाचे बेड शिल्लक नसल्याची स्थिती आहे. उस्मानाबादेतही रुग्णसंख्या वाढल्याने बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांवर जमिनीवर उपचार करावे लागत आहेत. त्याचवेळी नागरिक नियम पायदळी तुडवत असल्याचंही पाहायला मिळतंय. लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने तळीरामांनी दारुच्या दुकानासमोर एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

(वाचा -21 दिवसाच्या अंतरानं दिले जाणार Sputnik V चे 2 डोस, जाणून घ्या किती आहे प्रभावी? )

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत बेडची संख्या कमी पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. सोमवारी कोविड रुग्णालयासह शहरातील तसंच ग्रामीण भागातील सर्व खासगी रुग्णालयातील बेड फुल झाले होते. त्यामुळे रुग्णांवर जमिनीवरच उपचार करावे लागले.

सोमवारी सायंकाळी खासगी रुग्णालयांत फक्त 28 बेड रिकामे होते. मात्र सोमवारी विक्रमी संख्येने म्हणजे 680 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे बेडची उपलब्धता होणं अत्यंत कठीण झालं होतं. त्यामुळे प्रशासनाने शक्य असेल त्यांना घरीच उपचार घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तसं आवाहन केलं. मात्र असं असलं, तरी गंभीर रुग्णांना कुठे दाखल करायचं हा मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर आहे. अखेर आरोग्य यंत्रणेने जमिनीवरच रुग्णांना उपचार द्यायला सुरुवात केली.

(वाचा - VIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी)

एकीकडं आरोग्य व्यवस्थेची स्थिती इतकी गंभीर आणि रुग्णसंख्या प्रचंड वाढत असताना, नागरिकांना मात्र याचे गांभीर्य नसल्याचीही एक घटना घडली. सरकारकडून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकात असलेल्या दारुच्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी झाली होती. चार ते पाच तास ही गर्दी होती आणि त्यात कोरोनाचे कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचंही दिसून आलं. त्यामुळे एकिकडे रुग्णाना बेडअभावी जमिनीवर उपचार घ्यावे लागत असताना नागरिकांना मात्र कोरोना संसर्गाचं गांभीर्य नसल्याचंही पाहायला मिळालं.

Published by: News18 Desk
First published: April 13, 2021, 2:37 PM IST

ताज्या बातम्या